Cricket Lowest Score : क्रिकेट विश्वात (Cricket News) दररोज नवनवीन विक्रम होत असतात. कधी कुणी एका ओव्हरमध्ये 6 सिक्स ठोकण्याचा पराक्रम करतं. तर कधी कुणी एकदिवसीय सामन्यात द्विशतक झळकावतं. मात्र क्रिकेट विश्वात एका टीमने अक्षरश: कहर केलाय कहर. ही टीम अवघ्या 6 धावांवर ऑलआऊट झालीय. तुम्हाला वाचताना वाटेल की चुकीचं वाचतोय की काय, पण तसं नाही. एक टीमचा कारभार फक्त 6 धावांवर आटोपलाय. (vijay merchant trophy mp vs skm sikkim allot on 6 runs worst record in cricket history)
हा सर्व प्रकार अंडर 16 विजय मर्चंट ट्रॉफीत घडलाय. मध्य प्रदेश विरुद्ध सिक्कीम यांच्यात हा सामना खेळवण्यात आला. या सामन्यात सिक्कीमचा अवघ्या 6 धावांवर ‘गेम ओव्हर’ झाला. यासह 212 वर्षांआधीचा नकोशा विक्रम या संघाने मोडीत काढलाय. याआधी हा लाजीरवाणा विक्रम ‘द बीएस’ या टीमच्या नावावर होता. द बीएस इंग्लंड विरुद्ध 12 जून 1810 रोजी 6 रन्सवर ऑलआऊट झाली होती.
दरम्यान या दोन्ही संघातील सामना खोलवाडच्या जिमखाना ग्राउंड, सूरतमध्ये खेळवण्यात आला. या सामन्यात मध्यप्रदेशने सिक्कीमचा पराभव केला. सिक्कीमचा पहिला डाव अवघ्या 43 धावांवर आटोपला. मध्यप्रदेशने टॉस जिंकून बँटिंगचा निर्णय घेतला. मध्य प्रदेशने पहिला डाव 414 धावांवर घोषित केला.
414 धावांचा पाठलाग करायला आलेल्या सिक्कीमचा 43 धावांवर बाजार उठला. पहिल्या डावानंतर सिक्कीमचा पराभव दिसू लागला होता. मात्र सिक्कीम 6 धावांवर ढेर होईल, याचा कुणीच अंदाज सोडा, विचार ही केला नसेल. मध्यप्रदेशने हा सामना डाव आणि तब्बल 365 धावांनी जिंकला. मध्यप्रदेशकडून गिरीराज शर्माने 1 रन देत 5 विकेट्स घेतल्या. तर आलिफ हसनने 5 ओव्हर्समध्ये 4 जणांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला.