पर्थ: ऑस्ट्रेलियात एका चाहत्याने विराट कोहलीच्या हॉटेल रुममध्ये घुसखोरी केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या चाहत्याने विराटच्या रुममध्ये घुसखोरी केली व तिथे व्हिडिओ शूट केला. हाच व्हिडिओ त्याने सोशल मीडियावर शेयर केला. या सर्व प्रकारामुळे विराट कोहली चांगलचा संतापला आहे. विराटला हे अजिबात पटलेलं नाही. विराटने या सगळ्या प्रकारावर इन्स्टाग्रामवर पोस्ट शेयर करुन आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
विराटने काय म्हटलं?
चाहत्याच हे कृत्य म्हणजे व्यक्तीगत जीवनात ही घुसखोरी असल्याचं विराटने म्हटलं आहे. हा असा वेडपटपणा अजिबात पटलेला नाही हे विराट कोहलीने स्पष्ट केलय. “आवडत्या खेळाडूला पाहिल्यानंतर फॅन्सचं आनंदी होणं, त्याची उत्सुक्ता मी समजू शकतो. फॅन्स आवडत्या खेळाडूंना भेटण्यासाठी उत्सुक्त असतात, इथपर्यंत ठीक आहे. मी त्याच नेहमीच कौतुक केलय. पण हा व्हिडिओ धक्कादायक आहे” असं विराटने पोस्टमध्ये लिहिलय.
मग प्रायव्हसीची कुठे अपेक्षा करु?
“खासगी जीवनात हे अतिक्रमण आहे. मला माझ्या हॉटेल रुममध्ये प्रायव्हसी मिळणार नसेल, तर मग प्रायव्हसीची कुठे अपेक्षा करु?” असा सवाल विराटने केलाय. “हे मला पटलेलं नाही. लोकांच्या खासगी जीवनाचा आदर करा. मनोरंजनासाठी त्यांना वस्तू समजू नका” अशा शब्दात विराटने सुनावलय.
पत्नी अनुष्कासुद्धा खवळली
अनुष्काने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर व्हिडीओचा स्क्रीनशॉट शेअर करत पोस्ट लिहिली आहे. ‘काही घटना याआधीही अनुभवल्या आहेत, ज्यामध्ये काही चाहत्यांनी कोणतीही दया किंवा विनम्रता दाखवली नाही. परंतु ही खरोखर सर्वांत वाईट गोष्ट आहे. हे एका व्यक्तीच्या खासगी आयुष्याचा अपमान आणि त्याच्या अधिकारांचं उल्लंघन आहे. हे पाहून जर कोणी असा विचार करत असेल की सेलिब्रिटी आहे तर या गोष्टींचा सामना करावा लागेल, तर तुम्हीदेखील या समस्येचा एक भाग आहात.’‘काही प्रमाणात आत्मनियंत्रण प्रत्येकाने करावं. तसंच जर हे तुमच्या बेडरुममध्ये होत असेल तर मर्यादेची सीमा कुठे आहे?’, असा सवाल अनुष्काने उपस्थित केला आहे.