मुंबई: टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) सध्या प्रचंड खराब फॉर्म मध्ये आहे. टी 20 फॉर्मेट मध्ये त्याची कामगिरी खूपच निराशाजनक आहे. मागच्या अडीच वर्षापासून त्याने एकही शतक झळकवलेलं नाही. विराटचा असाच खराब फॉर्म सुरु राहिला, तर त्याला मोठा झटका बसू शकतो. इंग्लंड विरुद्धच्या (IND vs ENG) टी 20 सीरीज मध्ये त्याची बॅट तळपली नाही, तर त्याला संघातून वगळण्यात येऊ शकतं. यावर्षी ऑस्ट्रेलियात (Australia) ऑक्टोंबर-नोव्हेंबर मध्ये टी 20 वर्ल्ड कप होणार आहे. त्याआधी विराट कोहलीचा फॉर्म हा भारतीय संघ व्यवस्थापनासाठी चिंतेचा विषय आहे. सध्या टीमकडे असे फलंदाज आहेत, जे विराट कोहलीची जागा घेऊ शकतात. त्यामुळे सध्या सुरु असलेल्या इंग्लंड विरुद्धच्या मालिकेत विराट कोहलीला स्वत:ला सिद्ध करावं लागेल.
इंग्लंड विरुद्धच्या टी 20 सीरीज मध्ये विराट कोहलीने धावा केल्या नाहीत, तर निवड समितीचे सदस्य अन्य पर्यायांचा शोध सुरु करतील, असं बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याच्या हवाल्याने इनसाइड स्पोर्टने वृत्त दिलं आहे. “विराट कोहलीने भारतीय क्रिकेटची सेवा केली आहे. तो उत्तम क्रिकेटपटू आहे, याबद्दल कुठेही दुमत नाही. पण त्याचा खराब फॉर्म चिंतेचा विषय आहे. सिलेक्टर्सना नावाशी नाही, तर फॉर्म मध्ये असलेल्या खेळाडूंना निवडायचं असतं. विराटला लवकराच लवकर धावा कराव्या लागतील. इंग्लंड दौऱ्यात विराटने धावा केल्या नाहीत, तर निवडकर्ते दुसऱ्या पर्यायांचा शोध घेतील” असं सिलेक्शन कमिटीच्या या सदस्याने सांगितलं.
बीसीसीआयला आता विराट कोहली बाबत कुठलाही धोका पत्करायचा नाहीय. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, इंग्लंडमधली टी 20 सीरीज विराट कोहलीसाठी खूप महत्त्वाची आहे. विराट कोहली इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या टी 20 सामन्यात खेळणार नाही. पण दुसऱ्या आणि तिसऱ्या सामन्यात तो प्लेइंग 11 चा भाग असेल. रिपोर्टनुसार, निवड समितीने जाणूनबुजून वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी टी 20 संघाची घोषणा केलेली नाही. इंग्लंडमधील प्रदर्शनाच्या आधारावर वेस्ट इंडिजमधील टी 20 मालिकेसाठी संघ निवडण्यात येणार आहे.