मुंबई: भारतीय कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) काल कॅप्टनशिपचा राजीनामा दिला. विराटचा राजीनामा देण्याचा निर्णय अनेकांसाठी धक्कादायक आहे. पण सुनील गावस्कर मात्र याला अपवाद आहेत. भारताचे प्रसिद्ध क्रिकेटपटू सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) यांनी, विराटच्या राजीनामा देण्याच्या निर्णयाचं आपल्याला अजिबात आश्चर्य वाटले नाही, असं म्हटलं आहे. सुनील गावस्कर यांनी विराटच्या राजीनाम्यानंतर इंडिया टुडे वृत्तवाहिनीवर बोलताना अत्यंत स्फोटक विधान केलं आहे.
मला आश्चर्य वाटलं नाही
“मला विराटच्या राजीनामा देण्याच्या निर्णयाचं अजिबात आश्चर्य वाटलं नाही. खरंतर सामना संपल्यानंतर प्रेझेंटेशन सेरेमनी होते, तेव्हा विराट राजीनामा देईल, असं मला वाटलं होतं. पण तेव्हा त्यांने हा निर्णय जाहीर केला असता, तर कुठल्यातरी रागातून हा निर्णय घेतलाय, असा संदेश गेला असता. त्यामुळे विराट 24 तास थांबला व त्यानंतर त्याने हा निर्णय जाहीर केला” असे गावस्कर म्हणाले.
यशस्वी होता तरी राजीनामा का दिला?
विराट यशस्वी कर्णाधर होता, तरी त्याने राजीनामा का दिला? या प्रश्नावर गावस्कर म्हणाले की, “परदेशात मालिका हरणं बोर्ड आणि क्रिकेट चाहते दोघांकडूनही सहज स्वीकारलं जातं नाही.” “परदेशात मालिका गमावल्यानंतर कर्णधाराला पदावरुन हटवण्याचा धोका असतो. आधी सुद्धा हे घडलं आहे, आता सुद्धा असं घडू शकलं असतं. कर्णधारपदावरुन आपल्याला हटवलं जाईल, हा अंदाज विराटने बांधला असावा म्हणून त्याने कॅप्टनशिपचा स्वत:हून राजीनामा दिला” असं गावस्कर म्हणाले. कॅप्टनने व्यक्तीगत पातळीवर कितीही चांगली कामगिरी केली, तरी मालिकेच्या पराभवाचं सर्व खापर कर्णधारावरच फुटतं, असं गावस्कर म्हणाले.
(Virat Kohli prempted that he could be sacked as Test captain Sunil Gavaskar)