मुंबई: भारताच्या वनडे संघाचा नवीन कर्णधार रोहित शर्मासोबत (Roit sharma) माझे कुठलेही मतभेद नाहीत, असे विराट कोहलीने (Virat kohli) बुधवारी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. एकच गोष्ट वारंवार सांगून मला कंटाळा आलाय, असे विराट या मुद्यावर बोलताना म्हणाला. भारतीय संघ उद्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर रवाना होणार आहे. त्याआधी आज पत्रकार परिषद झाली. २६ डिसेंबरपासून भारत-दक्षिण आफ्रिकेमध्ये कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे.
रोहित आणि माझ्यामध्ये सर्वकाही सुरळीत आहे, असे सांगत सुरु असलेल्या अफवांचं खंडन केलं. “रोहित आणि माझ्यामध्ये कुठलीही समस्या नाही. प्रामाणिकपणे मागच्या अडीचवर्षापासून मी हीच गोष्ट सांगत आहे. मला आता हे सांगून कंटाळा आलाय. मला एकच प्रश्न सारखा विचारला जातो. मी एक गोष्ट तुम्हाला खात्रीने सांगतो, जो पर्यंत मी क्रिकेट खेळीन, तो पर्यंत माझी कृती आणि संवाद यातून संघाला कधीच खाली खेचणार नाही” असे विराटने सांगितले.
वनडे संघाच्या कर्णधारपदी निवड झाल्यानंतर रोहितने सुद्धा कोहलीच्या योगदानाचे कौतुक केले होते व संघातील त्याची भूमिका महत्त्वाची असल्याचे म्हटले होते. १९ जानेवारीपासून सुरु होणाऱ्या एकदिवसीय मालिकेसाठी कोहली उपलब्ध नसल्याच्या बातम्या आल्यानंतर दोघांमध्ये शीतयुद्धा सुरु असल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या.
आज कोहलीने स्वत:च या कथित वादांच्या चर्चांवर पडदा टाकला. “मी निवडीसाठी उपलब्ध आहे. तुम्ही असे प्रश्न मला विचारु नयेत. उलट हे प्रश्न तुम्ही जे, मी उपलब्ध नाही, असं लिहितात त्यांना आणि त्यांच्या सूत्रांना विचारा. मी निवडीसाठी नेहमीच उपलब्ध आहे” असे कोहलीने पत्रकारांना सांगितले.
संबंधित बातम्या:
‘खेळापेक्षा कोणी मोठा नाही’, क्रीडा मंत्री ठाकूर यांचं विराट-रोहित वादावर स्पष्ट मत
Sachin tendulkar : मास्टर ब्लास्टरची नवी ‘इनिंग’; कार कंपनीत कोट्यावधींची गुंतवणूक!
‘आव्हानांचा विचार केला, तर…’, टेस्ट टीममध्ये निवड झाल्यानंतर प्रियांक म्हणाला…