मुंबई | 16 ऑगस्ट 2023 : क्रिकेटर विराट कोहली त्याच्या अलिबागच्या फार्महाऊसवर क्रिकेट पिच बनवणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. असा दावा करणाऱ्या एका वृत्तावर आता थेट विराटनेच प्रतिक्रिया दिली आहे. विराट कोहली आणि अनुष्का शर्माने झिराड गावात आठ एकरची जागा खरेदी केली होती. याच ठिकाणी तो क्रिकेट पिच बांधणार असल्याचं म्हटलं जात होतं. मात्र विराटने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये यासंदर्भातील वृत्त शेअर करत खरी माहिती सांगितली. विराटने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये लिहिलं, ‘बचपन से जो अखबार पढा है, वो भी फेक न्यूज छापने लगे अब’ (लहानपणापासून जे वृत्तपत्र वाचलं, तेसुद्धा आता फेक न्यूज देत आहेत). यासोबतच त्याने संबंधित वृत्त शेअर केलं आहे.
गेल्या वर्षी विराटने अलिबागमध्ये दुसरी मालमत्ता खरेदी केली होती. तब्बल 2 हजार स्क्वेअर फूट व्हिलाच्या व्यवहारासाठी त्याने 36 लाख रुपये मुद्रांक शुल्क भरल्याचं म्हटलं गेलं होतं. तर त्या मालमत्तेची किंमत ही जवळपास 6 कोटी रुपये असल्याचं समजतंय.
विराटने याआधीही अशा प्रकारच्या वृत्तांवर थेट स्पष्टीकरण दिलं आहे. विराटचा सोशल मीडियावर खूप मोठा चाहतावर्ग आहे. इन्स्टाग्रामवर त्याचे तब्बल 2 कोटी 56 लाख फॉलोअर्स आहेत. इन्स्टाग्रामवरील एका पोस्टसाठी विराट कोट्यवधी रुपये घेत असल्याचंही वृत्त याआधी समोर आलं होतं. त्यावरही विराटने ट्विट करत ते वृत्त खोटं असल्याचं स्पष्ट केलं होतं. ‘मला माझ्या आयुष्यात जे काही मिळालं, त्यासाठी मी कृतज्ञ आणि ऋणी आहे. पण माझ्या सोशल मीडिया कमाईबाबत जे वृत्त पसरतंय, ते खरं नाही’, असं ट्विट त्याने केलं होतं.
इन्स्टाग्राम या फोटो शेअरिंग ॲपवर सर्वाधिक कमाई करणाऱ्या सेलिब्रिटींमध्ये विराट तिसऱ्या क्रमांकावर असल्याचं म्हटलं गेलं होतं. इतकंच नव्हे तर एका इन्स्टाग्राम पोस्टसाठी तो किती रुपये मानधन घेतो, याचीही माहिती समोर आली होती. इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या एका फोटोसाठी तो तब्बल 11.45 कोटी रुपये घेत असल्याचं वृत्त देण्यात आलं होतं.