मुंबई : भारतीय कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहलीचा कार्यकाळ दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या केपटाऊन कसोटीतील पराभवाने संपुष्टात आला. शनिवारी 15 जानेवारी रोजी कोहलीने कसोटी संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला. कर्णधार म्हणून कोहलीने शेवटच्या सामन्यात 79 आणि 29 धावा केल्या, पण 7 वर्षे टिकलेल्या कर्णधारपदात कोहलीची बॅट दुप्पट ताकदीने बरसली आणि अनेक विक्रम झाले.
डिसेंबर 2014 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अॅडलेड कसोटी सामन्यात कोहलीने प्रथमच कर्णधारपद भूषवले होते. त्या सामन्याच्या दोन्ही डावात कोहलीने शतके झळकावली होती. क्रिकेट इतिहासात त्याच्या कर्णधारपदाच्या पदार्पणातच सामन्याच्या दोन्ही डावात शतक झळकावणारा तो ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार ग्रेग चॅपेलनंतरचा दुसरा फलंदाज ठरला.
कोहलीने कर्णधार म्हणून 68 कसोटी सामन्यांमध्ये 20 शतके झळकावली. अशाप्रकारे, तो कर्णधार म्हणून सर्वाधिक शतके झळकावणारा भारतीय खेळाडू आहे, तर दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार ग्रॅमी स्मिथ (25) नंतर तो जगातील दुसरा फलंदाज आहे.
कोहलीच्या बॅटने या 68 कसोटी सामन्यांच्या 113 डावांमध्ये एकूण 5,864 धावा फटकावल्या, ज्यात त्याची सरासरी 54.80 इतकी होती. भारतीय कर्णधारांमध्येही हे प्रमाण सर्वाधिक आहे. केवळ ग्रॅमी स्मिथ (8,659), अॅलन बॉर्डर (6,623) आणि रिकी पाँटिंग (6,542) यांनी त्याच्यापेक्षा जास्त धावा केल्या आहेत.
हे रेकॉर्ड्स इथवरच संपत नाहीत. कोहलीने कसोटी क्रिकेटमध्ये 7 द्विशतके झळकावली आहेत. ही सातही द्विशतके तो कर्णधार असताना झळकावली आहेत. अशाप्रकारे कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक द्विशतके झळकावणारा कर्णधार बनण्याचा विक्रमही त्याच्या नावावर आहे.
याशिवाय 2019 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पुणे कसोटीत कोहलीने 254 धावांची (नाबाद) खेळी खेळली होती. कसोटीतील कोणत्याही भारतीय कर्णधाराची ही सर्वात मोठी खेळी आहे. विशेष म्हणजे या यादीत दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावरदेखील कोहलीचंच नाव आहे. त्याने कर्णधार म्हणून श्रीलंकेविरुद्ध 243 आणि इंग्लंडविरुद्ध 235 धावांची खेळी केली आहे. इतकेच नव्हे तर नॉर्थ साऊंडमध्ये वेस्ट इंडिजविरुद्धची 200 धावांची खेळी ही कोणत्याही भारतीय कर्णधाराची परदेशातील कसोटीतील सर्वोच्च धावसंख्या आहे.
कोहलीने कर्णधार म्हणून तिन्ही फॉरमॅटमध्ये 41 शतके झळकावली आणि या बाबतीत ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज क्रिकेटपटू रिकी पॉन्टिंगची बरोबरी केली आहे. गेल्या दोन वर्षात एकही शतक न केल्यामुळे कोहलीला हा विक्रम आपल्या नावावर करता आला नाही.
इतर बातम्या
ViratKohli: Wisden इंडियाने खास टि्वट करुन विराटच्या कॅप्टनशिपला केला सलाम
(Virat Kohli Records As a Captain in Cricket)