सिडनी: ऑस्ट्रेलियात T20 वर्ल्ड कप संपून, आता दोन आठवड्यापेक्षा जास्त वेळ झाला आहे. भारतीय टीमच सेमीफायनलमध्ये आव्हान संपुष्टात आलं. इंग्लंडने टीम इंडियाचा 10 विकेटने दारुण पराभव केला. टीम इंडियासाठी वर्ल्ड कपचा शेवट खूप खराब झाला. मात्र, तरीही या वर्ल्ड कप स्पर्धेने भारतीय क्रिकेटलाच नाही, संपूर्ण क्रिकेट विश्वाला काही संस्मरणीय आठवणी दिल्या. मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडच्या मैदानात विराट कोहलीने मारलेले ते दोन षटकार कायस्वरुपी क्रिकेट रसिकांच्या मनात कोरले गेले आहेत. आता पहिल्यांदाच पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हॅरिस रौफने या दोन सिक्सवर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
टीम इंडियाचा रोमांचक विजय
23 ऑक्टोबरला भारत-पाकिस्तानचे संघ वर्ल्ड कपचा पहिला सामना खेळले. मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडच्या मैदानात हा सामना पाहण्यासाठी 90 हजारपेक्षा जास्त प्रेक्षक उपस्थित होते. जगभरातील कोट्यवधी लोक हा सामना पाहत होते. भारताने हा सामना शेवटच्या चेंडूवर जिंकला. अत्यंत रोमांचक ठरलेल्या या सामन्यात विराट कोहली भारताच्या विजयाचा हिरो ठरला. माजी भारतीय कर्णधार विराटने या सामन्यात 53 चेंडूत नाबाद 82 धावा केल्या.
हॅरिस रौफ काय म्हणाला?
भारत-पाकिस्तान मॅचमध्ये खास क्षण आला तो, 19 व्या ओव्हरमध्ये. विराट कोहलीने त्या षटकात दोन षटकार लगावले. ज्याने संपूर्ण सामन्याचा नूरच पालटला. भारताला त्यावेळी 8 चेंडूत 28 धावांची गरज होती. कोहलीने वेगवान गोलंदाज हॅरिस रौफला स्ट्रेट बॅटने लॉन्ग ऑनला सिक्स मारला. हा सिक्स पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. कारण असा सिक्स मारणं सोपं नव्हतं. हॅरिस रौफने आता त्या सिक्सबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ‘फक्त असा शॉट कोहलीच मारु शकतो’, असं क्रिकविक युट्यूब चॅनलवरील मुलाखतीत रौफ म्हणाला.
त्याचा क्लासच वेगळा
“वर्ल्ड कपमध्ये विराट कोहली जे खेळला, तो त्याचा क्लास आहे. तो कशा पद्धतीचे शॉट मारु शकतो, हे सगळ्यांना माहित आहे. मॅचमध्ये त्याने त्यावेळी जे षटकार मारले, तसे षटकार मारणं दुसऱ्या प्लेयरला जमलं असतं, असं मला वाटत नाही. दिनेश कार्तिक किंवा हार्दिक पंड्याने ते सिक्स मारले असते, तर मला नक्कीच वाईट वाटलं असतं. कोहलीने सिक्स मारले हरकत नाही, त्याचा क्लासच वेगळा आहे” असं हॅरिस रौफ म्हणाला.
हॅरिस रौफने सांगितली लास्ट ओव्हरमधली गणितं
“तू तुझ्या गोलंदाजीच्या योजनेत अपयशी ठरलास का? या प्रश्नावर रौफ म्हणाला की, पुढची ओव्हर मोहम्मद नवाज टाकणार हे मला माहित होतं. तो स्पिनर आहे. 4 बाऊंड्रीची गरज लागेल, इतका स्कोर टीम इंडियासाठी सोडण्याची माझी इच्छा होती. मी ओव्हरच्या पहिल्या 4 चेंडूंपैकी 1 वेगवान चेंडू टाकला, 3 धीम्या गतीचे चेंडू होते. समोर मोठी बाऊंड्री असल्याने धीमा चेंडू टाकण्याचा मी विचार केला. कोहली समोर मारेल, असं मला वाटलं नव्हतं. मी योग्य चेंडू टाकला होता. पण कोहलीने सिक्स मारला, तो त्याचा क्लास आहे” असं रौफ म्हणाला.