लखनौ : आयपीएलच्या चालू आठवड्याची सुरुवात वादाने झाली. रॉयल चॅलेंजर्स बँगलोर आणि लखनौ सुपर जायंट्समधील सामना जय-पराजयापेक्षा वादामुळे जास्त गाजला. विराट कोहली एकटा लखनौच्या टीममधील तिघांना भिडला. मॅच संपल्यानंतर विराट कोहलीच अफगाणिस्तानचा नवीन उल हक आणि लखनौ टीमचा मेंटॉर गौतम गंभीर बरोबर बरच वाजलं. या वादाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले.
या भांडणाची शिक्षा म्हणून विराट आणि गौतमची शंभर टक्के मॅच फी कापण्यात आली. नवीन उल हकला सुद्धा शिक्षा मिळाली. जे काही झालं, ते क्रिकेटसाठी चांगल नव्हतं, असंच सगळ्यांच मत आहे.
विराट विरुद्ध गंभीर नव्याने उफाळून येऊ शकतो वाद
हा वाद आता कुठे शांत होत असताना, नवीन उल हक आणि गौतम गंभीरने मिळून पुन्हा एकदा विराट कोहलीची कळ काढली आहे. दोघांनी शनिवारी एका उपरोधिक पोस्टमधून विराट कोहलीला लक्ष्य केल्याची चर्चा आहे. हे तिघेही सर्व वादाच्या केंद्रस्थानी आहेत. नवीन उल हकच्या इन्स्टाग्राम पोस्टमुळे नव्याने वाद उफाळून येऊ शकतो.
इन्स्टापोस्टमध्ये नवीन उल हकने काय लिहिलय?
“लोकांनी आपल्याला ज्याप्रकारे वागणूक द्यावी असं वाटतं, तशीच वागणूक तुम्ही लोकांना द्या. त्यांनी तुमच्याशी कशा पद्धतीने बोललं पाहिजे याबद्दल अपेक्षा असेल तर तुम्हीसुद्धा त्यांच्याशी तसंच बोला” असं नवीन उल हकने त्याच्या इन्स्टापोस्टमध्ये म्हटलय. सोबत त्याने गौतम गंभीरचा फोटो पोस्ट केलाय. नवीनच्या या पोस्टवर गौतम गंभीरने कमेंट करताना ‘जसा आहेस तसा राहा, बदलू नकोस’ असं म्हटलय.
मॅचमध्ये काय झालेलं?
आरसीबीच्या विजयानंतर विराट कोहली आणि गौतम गंभीरमध्ये शाब्दीक वादावादी वाढत गेली. अन्य खेळाडूंना मध्ये येऊन दोघांना लांब कराव लागलं. या भांडणाआधी मॅच सुरु असताना विराट कोहली आणि नवीन उल हक यांच्यात सामना सुरु असताना वाजलं होतं. विराटने नवीन उल हकला बूट सुद्धा दाखवला होता.