मुंबई: भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) 2008 सालच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्यावेळी (India Australia Tour) एक मोठं पाऊल उचलण्याच्या मनस्थितीमध्ये होता. त्याने मनाची तयारी सुद्धा केली होती. वीरेंद्र सेहवागने आता त्याबद्दल खुलासा केला आहे. सेहवागने त्यावेळी हे पाऊल उचललं असतं, तर त्यावरुन मोठा गहजब झाला असता. 2008 सालीच वीरेंद्र सेहवाग एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारणार होता. त्यामागे कारण होतं, एमएस धोनी. (MS dhoni) एमएस धोनीने सेहवागला काही सामन्यातून वगळलं होतं, त्यामुळे चिडलेला सेहवाग निवृत्तीच्या विचारात होता. पण त्यावेळी सचिन तेंडुलकरने आपल्याला निवृत्तीची घोषणा करण्यापासून रोखलं, असं सेहवाग म्हणाला. तिरंगी मालिकेतील पहिल्या चार सामन्यात सेहवागने 6,33,11 आणि 14 अशा धावा केल्या होत्या. त्यामुळे त्याला प्लेइंग 11 मधून वगळण्यात आलं होतं. सीबी सीरीच्या बेस्ट ऑफ थ्री फायनल्समध्ये भारताने ऑस्ट्रेलियावर ऐतिहासिक विजय मिळवला होता. पण सेहवागची त्या विजयामध्ये काही भूमिका नव्हती.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर वीरेंद्र सेहवाग पुढची 7 ते 8 वर्ष तिन्ही फॉर्मेटमध्ये भारताकडून खेळला. 2011 साली भारताच्या वर्ल्ड कप विजेत्या संघाचाही तो भाग होता. विराट कोहली फॉर्ममध्ये नाहीय, त्याने ब्रेक घेतला पाहिजे का? त्या प्रश्नावर उत्तर देताना वीरेंद्र सेहवागने हा किस्सा सांगितला. महत्त्वाच म्हणजे सेहवाग आणि कोहली दोघे दिल्लीचे आहेत.
“2008 साली आम्ही ऑस्ट्रेलियात होतो. त्यावेळी निवृत्तीचा विचार माझ्या डोक्यात आला होता. मी कसोटी मालिकेत कमबॅक केलं व 150 धावा फटकावल्या. एकदिवसीय मालिकेत तीन-चार सामन्यात मी धावा करु शकलो नाही. त्यामुळे एमएस धोनीने मला संघातून वगळलं. त्यावेळी निवृत्तीचा विचार माझ्या डोक्यात आला होता. मी कसोटी क्रिकेटमध्येच खेळत रहावं, अस मला वाटत होतं” सेहवागने क्रिकबझशी बोलताना हा खुलासा केला.
“सचिन तेंडुलकरने त्यावेळी मला वनडे क्रिकेटमधून राजीनामा देण्यापासून रोखलं होतं. आयुष्याचा हा वाईट काळ असून थोडं थांब. या दौऱ्यानंतर घरी जा. विचार कर आणि त्यानंतर ठरव पुढे काय करायचं आहे, सुदैवाने त्यावेळी मी माझी निवृत्ती जाहीर केली नाही” असं सेहवागने सांगितलं.