नवी दिल्ली: T20 वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये टीम इंडियाचा पराभव झाला. टीम इंडिया आता न्यूझीलंड विरुद्धच्या टी 20 सीरीजची तयारी करतेय. रोहित शर्मा, विराट कोहली आणि केएल राहुल या सिनियर खेळाडूंना न्यूझीलंड सीरीजसाठी विश्रांती देण्यात आलीय. हार्दिक पंड्या टी 20 सीरीजमध्ये टीम इंडियाच नेतृत्व करणार आहे.
18 नोव्हेंबरपासून न्यूझीलंड विरुद्धची मालिका सुरु होतेय. टॉप ऑर्डरमध्ये शुभमन गिल, इशान किशन आणि श्रेयस अय्यर खेळताना दिसणार आहेत. सूर्यकुमार यादवही या टीममध्ये आहेत.
152 पेक्षा जास्त स्ट्राइक रेट
टीम इंडियाचा माजी खेळाडू विरेंद्र सेहवागने पृथ्वी शॉ चा टीममध्ये समावेश नाहीय, त्याकडे लक्ष वेधलय. पृथ्वी शॉ मुंबई टीमचा सलामीवीर आहे. मागच्या काही महिन्यांपासून त्याने चांगली कामगिरी केलीय. यंदाच्या आयपीएलमध्ये तो दिल्ली कॅपिटल्सकडून 152 पेक्षा जास्त स्ट्राइक रेटने खेळला.
पृथ्वी शॉ चा टीम इंडियात समावेश केला पाहिजे, असं विरेंद्र सेहवागच मत आहे. यापूर्वी जुलै 2021 मध्ये पृथ्वी शॉ टीम इंडियाकडून टी 20 सीरीजमध्ये खेळला. त्याचवेळी त्याने टी 20 क्रिकेटमध्ये डेब्यु केला होता.
2023 वर्ल्ड कप टीममध्ये दिसेल अशी अपेक्षा
“मला पृथ्वी शॉ ला टीममध्ये पहायच होतं. तो टी 20 आणि वनडे दोन्ही टीममध्ये नाहीय. टेस्ट तर तो खेळलाच नाहीय. सध्या टीम बाहेर आहे. पुढच्या काही दिवसात मला पृथ्वी शॉ ला टीममध्ये पहायचय. 2023 चा वर्ल्ड कप टीममध्ये तो दिसेल अशी अपेक्षा आहे” असं सेहवाग म्हणाला.
तुम्ही अतिरिक्त खेळाडू म्हणून त्याला घेऊन जाऊ शकता
“पृथ्वी शॉ टॉप ऑर्डरमध्ये खेळणारा प्लेयर आहे. त्याचा स्ट्राइक रेट 150 च्या जवळ आहे. तो टी 20 फॉर्मेटसाठी एक चांगला पर्याय आहे. तुम्ही अतिरिक्त खेळाडू म्हणून त्याला घेऊन जाऊ शकता” न्यूझीलंड विरुद्ध मालिकेसाठी निवडलेल्या संघाविषयी सेहवाग बोलत होता.