एडिलेड: टीम इंडियाच टी 20 वर्ल्ड कपमधील आव्हान संपुष्टात आलय. काल वर्ल्ड कप सेमीफायनलमध्ये इंग्लंडने टीम इंडियावर 10 विकेटने विजय मिळवला. वर्ल्ड कपच्या महत्त्वाच्या सामन्यात टीम इंडियाचा इतका दारुण पराभव होईल, अशी कोणीही अपेक्षा केली नव्हती. या पराभवामुळे कोट्यवधी भारतीय क्रिकेट चाहते निराश झाले आहेत. पराभवानंतर टीम इंडियात बदलाची मागणी होत आहे.
राहुल द्रविड यांना विश्रांती
T20 वर्ल्ड कपनंतर लगेच टीम इंडियाच्या न्यूझीलंड दौऱ्याला सुरुवात होणार आहे. या सीरीजसाठी हेड कोच राहुल द्रविड यांना विश्रांती देण्यात आली आहे. लवकरच द्रविड यांच्या कामगिरीचा सुद्धा आढावा घेतला जाईल.
सपोर्ट स्टाफमध्ये तीन महत्त्वाचे बदल
टीम इंडियाचे माजी क्रिकेटपटू व्ही.व्ही.एस लक्ष्मण हे न्यूझीलंड दौऱ्यात हेडकोच पदाची जबाबदारी संभाळतील. राहुल द्रविड, बॉलिंग कोच पारस म्हांब्रे आणि बॅटिग कोच विक्रम राठोड हे मायदेशी भारतात परततील. मागच्या काही महिन्यांपासून ते टीम इंडियासोबत होते. यापुढे ते बांग्लादेश दौऱ्यावर जातील. ऋषीकेश कानिटकर (बॅटिंग कोच), साईराज बहुतुले (बॉलिंग कोच) हे लक्ष्मण यांच्यासोबत न्यूझीलंड दौऱ्यामध्ये असतील. बीसीसीआयमधील सूत्रांच्या हवाल्याने टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलय.
व्ही.व्ही.एस लक्ष्मण सध्या बीसीसीआयच्या बंगळुरुमधील राष्ट्रीय क्रिकेट अकादामीचे प्रमुख आहेत. आयर्लंड आणि झिम्बाब्वे सीरीजमध्येही लक्ष्मण यांनी कोचपदाची जबाबदारी संभाळलीय.
न्यूझीलंड सीरीजमध्ये किती वनडे आणि किती टी 20 सामने?
येत्या 18 नोव्हेंबरपासून टीम इंडियाचा न्यूझीलंड दौरा सुरु होणार आहे. 30 नोव्हेंबरपर्यंत ही सीरीज चालेल. तीन वनडे आणि तीन टी 20 सामने या मालिकेत खेळले जाणार आहेत.