मुंबई: नियमित कर्णधार म्हणून जोस बटलरच्या (Jos buttler) करीयरची खराब सुरुवात झाली आहे. सीरीजमधील पहिल्याच टी 20 सामन्यात भारताने इंग्लंडचा (IND vs ENG) तब्बल 50 धावांनी पराभव केला. मागच्या आठवड्यात इयॉन मार्गन निवृत्त झाला. त्याच्याजागी बटलरला इंग्लंडचा वनडे आणि टी 20 संघाचं कर्णधार बनवण्यात आलं आहे. कॅप्टन म्हणून बटलरसाठी ही खराब सुरुवात आहे, तसंच फलंदाज म्हणूनही तो अपयशी ठरला. भुवनेश्वर कुमारने, (Bhuneshwar Kumar) तर बटलरला खातही उघडू दिलं नाही. एका उत्तम इन स्विंगर चेंडूवर त्याच्या दांड्या गुल केल्या. बटलरला पहिल्या षटकात माघारी परताव लागलं. भुवनेश्वरचा चेंडू फ्लिक करण्याच्या प्रयत्नात चेंडू बटलरच्या पॅडला लागला व लेग स्टम्प उडवला. भुवनेश्वरचे पहिले चार चेंडू दुसरा सलामीवीर जेसन रॉयने खेळून काढले. पाचव्या इन स्विंग चेंडूवर बटलर खात न उघडता माघारी परतला. आतापर्यंत सात सामन्यात बटलरने इंग्लंड कर्णधारपद भूषवलं आहे. कॅप्टन म्हणून खेळताना तो चौथ्यांदा डकवर आऊट झाला.
हार्दिक पंड्याने त्यानंतर डेविड मलान (21) आणि लियाम लिव्हिंगस्टोनला (0) आऊट केलं. पावरप्ले मध्ये इंग्लंडची स्थिती तीन बाद 29 होती. सलामीवीर जेसन रॉयला हार्दिकनेच बाद केलं. थर्ड मॅनला हर्षल पटेलकरवी झेलबाद केलं. सॅम करनची विकेट सुद्धा त्यानेच काढली. हार्दिकने काल ऑलराऊंडर खेळाचं प्रदर्शन केलं. 51 धावांची अर्धशतकी खेळी आणि चार षटकात 33 धावा देऊन त्याने चार विकेट काढल्या. या प्रदर्शनासाठी हार्दिकला सामनावीराच्या पुरस्कारने गौरवण्यात आलं.
भारताने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात आठ बाद 198 धावा केल्या. प्रत्युत्तरात इंग्लंडचा डाव 19.3 षटकात 148 धावात आटोपला. “आम्ही चांगले खेळलो नाही. भारताने अप्रतिम गोलंदाजी केली. आम्ही तिथून पुनरागमन करु शकलो नाही. भारतीय गोलंदाजांचे चेंडू सातत्याने स्विंग होत होते. त्यांना त्यावर विकेट मिळाले” असं बटलर म्हणाला.
BOWLED!
Bhuvneshwar Kumar gets the big wicket, Jos Buttler gone for duck ? #ENGvIND pic.twitter.com/NClQLHXFgp
— Doordarshan Sports (@ddsportschannel) July 7, 2022
सूर्यकुमारने हार्दिक पांड्यासोबत चौथ्या विकेटसाठी 37 धावांची भागीदारी केली. सूर्या 19 चेंडूंत चार चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने 39 धावा काढून बाद झाला. अक्षर पटेल 12 चेंडूत 17 धावा, दिनेश कार्तिक 7 चेंडूत 11 धावा आणि हर्षल पटेल 6 चेंडूत 3 धावा करून बाद झाला. यादरम्यान हार्दिकने टी-20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील पहिले अर्धशतक झळकावले. तो 33 चेंडूंत सहा चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 51 धावा करून बाद झाला.भुवनेश्वर कुमार एका धावेवर नाबाद राहिला आणि अर्शदीप सिंगने दोन धावा केल्या. इंग्लंडकडून मोईन अली आणि ख्रिस जॉर्डनने प्रत्येकी दोन बळी घेतले. याशिवाय रीस टोपले, टायमल मिल्स आणि पार्किन्सन यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.