वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजेंड्स या स्पर्धेत माजी दिग्गज खेळाडूंनी सहभाग घेतला. आतापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपल्या खेळीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. त्यामुळे आपल्या लाडक्या क्रिकेटपटूंना पुन्हा खेळताना पाहण्याची मजा काही वेगळीच होती. ख्रिस गेल, शाहीद आफ्रिदीसारखे दिग्गज खेळाडू पुन्हा एकदा मैदानात उतरले होते. त्यामुळे षटकार आणि चौकारांचा पाऊस पडेल असं वाटत होतं. टीम इंडियाची धुराही सिक्सर किंग युवराज सिंगच्या हाती होती. पण या सर्वांपेक्षा वरचढ ते पठाण बंधू..या दोघांनी षटकार मारून मारून विरोधी संघाची स्थिती नाजूक केली. वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजेंड्सच्या अंतिम सामन्यातही इरफान पठाण आणि युसूफ पठाण यांनी असाच आक्रमक पवित्र घेतला. त्यांच्या या आक्रमक खेळीचं सर्वत्र कौतुक होत आहे. असं असताना त्यांना याबाबत विचारलं तर त्यांनी यामागे कर्णधार युवराज सिंग असल्याचं सांगितलं. इरफान पठाणने सांगितलं की, ‘आम्हाला खुली सूट मिळाली होती. आम्हा दोघा भावांना ग्राउंडमध्ये जाऊन मारण्याचं लायसन्स मिळालं होतं आणि आम्ही तेच केलं. आम्ही कर्णधाराचं म्हणणं ऐकलं आणि बॅट फिरवणं चालूच ठेवलं.’
“युवराज सिंगने आम्हा दोघा भावाना स्पष्ट सांगितलं होतं की, त्यांना आपल्या गोलंदाजीशी देणंघेणं नाही. त्यांना आपल्या फलंदाजीतून निघणाऱ्या षटकारांनी देणंघेणं आहे. ते आमच्याकडून सिक्सवर सिक्स इच्छित आहेत.”, असं इरफान पठाणने सांगितलं. पठाण बंधूंनी कर्णधार युवराज सिंगचं म्हणणं ऐकलं आणि वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजेंड्समध्ये एकूण 20 षटकार मारले. दोघा भावांमध्ये षटकार मारण्यासाठी चढाओढ लागली होती असं म्हंटलं तर वावगं ठरणार नाही. दोघा भावांनी प्रत्येकी 10-10 षटकार मारले.
वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजेंड्स स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम फलंदाजी स्वीकारली. पाकिस्तानने विजयासाठी 157 धावांचं आव्हान दिलं होतं. हे आव्हान टीम इंडियाने 19.1 षटकात 5 गडी गमवून पूर्ण केलं. या विजयासह जेतेपदावर नाव कोरलं आहे. पाकिस्तानने या स्पर्धेतील साखळी फेरीत भारताला मोठ्या फरकाने पराभूत केलं होतं. मात्र त्याचा हिशेब टीम इंडियाने अंतिम सामन्यात पूर्ण केला.