IPL 2024 च्या दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात सनरायजर्स हैदराबादने राजस्थान रॉयल्सचा पराभव केला. या हारमुळे राजस्थान रॉयल्सला आपल्या दुसऱ्या जेतेपदासाठी आणखी प्रतिक्षा करावी लागणार आहे. दोन वर्षांपूर्वी संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली राजस्थानची टीम फायनलमध्ये पोहोचली होती. पण हार्दिक पांड्याच्या गुजरात टायटन्सने त्यांना पराभूत केलं. IPL 2023 मध्ये थोडक्यात त्यांची प्लेऑफची संधी हुकली. काल महत्त्वाच्या सामन्यात राजस्थानची फलंदाजांची फळी कोसळली. दव पडला नाही. त्याचा शाहबाज अहमद आणि अभिषेक शर्मा या स्पिनर्सनी फायदा उचलला. या दोघांची गोलंदाजी खेळताना राजस्थान रॉयल्सचा डाव गडगडला. फॉर्ममध्ये असलेला रियान पराग लवकर बाद झाला. हा राजस्थानसाठी मोठा झटका होता.
SRH ने दिलेल्या 176 धावांच्या टार्गेटचा पाठलाग करताना 8.3 ओव्हर्सनंतर राजस्थानची स्थिती 67-3 होती. शाहबाज आणि अभिषेकची गोलंदाजी सुरु झाल्यानंतर राजस्थानचा डाव आणखी अडचणीत सापडला. 22 चेंडूत राजस्थानला एक बाऊंड्री मारता आली नाही. त्यामुळे फलंदाजांवर दबाव वाढत गेला. रियान पराग 9 चेंडूत 6 धावांवर खेळत होता. त्याने शाहबाज अहमदच्या गोलंदाजीवर हल्ला चढवण्याचा निर्णय घेतला. शाहबाजने त्याआधी नऊ सामन्यात एकही विकेट घेतला नव्हता.
सुनील गावस्करांची परखड शब्दात टीका
शाहबाज 12 वी ओव्हर टाकत होता. त्याच्या पहिल्या चेंडूवर रियान परागने सिक्स मारण्याचा प्रयत्न केला. पण डीप मिडविकेटला अभिषेक शर्माने आरामात झेल घेतला. रियान पराग बाद झाल्यानंतर सुनील गावस्कर यांनी आपला संताप व्यक्त केला. राजस्थानच्या या युवा फलंदाजावर त्यांनी एकदम परखड शब्दात टीका केली.
सुनील गावस्कर काय बोलले?
“तुम्ही जर विचारच करणार नसाल, तर अशा टॅलेंटचा काय उपयोग? हा कुठल्या प्रकारचा शॉट होता?” गावस्कर ऑन एअर हे बोलले. त्यांच्या शब्दातून संताप व्यक्त झाला. “तुमच्याकडे टॅलेंट असेल, पण परिस्थितीनुसार खेळता येत नसेल, तर उपयोग होणार नाही. तुम्ही काही निर्धाव चेंडू खेळले म्हणून काय झालं?” अशा शब्दात सुनील गावस्करांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.