नवी दिल्ली : टीम इंडिया वेस्ट इंडिजमध्ये दाखल झाली आहे. बारबाडोसमध्ये टीम इंडियाने आपली प्रॅक्टिस सुरु केली आहे. 12 जुलैपासून टेस्ट सीरीजची सुरुवात होईल. यावेळच्या वेस्ट इंडिज दौऱ्यातून टीम इंडियातून काही ओळखीचे चेहरे गायब आहेत. कोणाला ड्रॉप करण्यात आलं आहे, तर कोणाला विश्रांती दिली आहे. काही दुखापतीमुळे टीमच्या बाहेर आहेत. काही नव्या चेहऱ्यांची टीममध्ये एंट्री झाली आहे. कोणाला संधी मिळणार ? कोणाला नाही? याची चर्चा सुरु आहे. या दरम्यान एका नावाचा सगळ्यांना विसर पडला आहे. त्याने 4 वर्षांपूर्वी वेस्ट इंडिजमध्ये धावांच्या राशी उभारल्या होत्या.
2019 मध्ये टीम इंडिया टेस्ट सीरीजसाठी वेस्ट इंडिज दौऱ्यावर गेली होती. रोहित शर्मा टेस्ट टीमच्या बाहेर होता. विराट कोहली कॅप्टन होता. केएल राहुल, मयंक अग्रवाल आणि चेतेश्वर पुजारा टीमचा भाग होते. हे चारही फलंदाज फ्लॉप ठरले होते. त्यावेळी दोघांनी टीम इंडियाला वाचवलं होतं. त्यातला अजिंक्य राहणे आता टीमसोबत आहे. दुसरा हुनमा विहारी, त्याची निवड झालेली नाही.
कॅरेबियाई विजयाचा हिरो
चार वर्षांपूर्वी भारत आणि वेस्ट इंडिजमध्ये 2 मॅचची टेस्ट सीरीज झाली होती. टीम इंडियाने ही सीरीज 2-0 ने जिंकली होती. हनुमा विहारी टीम इंडियाचा स्टार ठरला होता. त्यावेळी 25 वर्षांचा हनुमा विहारी टीम इंडियात आपल स्थान पक्क करण्याचा प्रयत्न करत होता. देशांतर्गत क्रिकेटमध्ये झुंजार इनिंग आणि शतकी खेळीमुळे त्याने स्वत:ची ओळख बनवली होती. टीम इंडियामध्ये त्याला चेतेश्वर पुजाराचा पर्याय म्हणून पाहिलं जात होतं.
4 इनिंगमध्ये किती धावा?
वेस्ट इंडिज दौऱ्यात हनुमा विहारीने स्वत:ला सिद्ध केलं होतं. विहारीने 6 व्या नंबरवर बॅटिंग करायचा. त्याने 4 इनिंगमध्ये सर्वाधिक 289 धावा केल्या होत्या. 96 च्या सरासरीने त्याने एक सेंच्युरी आणि दोन हाफ सेंच्युरी झळकवली होती. या प्रदर्शनानंतर हनुमा विहारीची टीम इंडियात जागा पक्की व्हायला पाहिजे होती. पण असं झालं नाही. टीममध्ये पुजारा, रहाणे आणि कोहली सारखे सीनियर होते.
कठीणात कठीण प्रसंगात संधी
वेस्ट इंडिज दौऱ्यानंतर हनुमा विहारी टीम इंडियासाठी एकूण 10 टेस्ट मॅच खेळलाय. यात 17 इनिंगमध्ये त्याने 2 हाफ सेंच्युरी झळकल्या आहेत. म्हणजे काही खास प्रदर्शन केलं नाही. 10 पैकी 6 टेस्ट मॅच तो न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये खेळला. तिन्ही कसोटीच्यावेळी परिस्थिती कठीण होती. एक टेस्ट मॅच इंग्लंडमध्ये झाली. विहारी खेळलेल्या बहुतांश कसोटी सामन्यात टीम इंडियाची मधली फळी कोसळली होती. अशावेळी एकट्या विहारीला दोष देता येणार नाही. सिडनी कसोटी हॅमस्ट्रिंगची दुखापत होऊनही त्याने 40 ओव्हर बॅटिंग केली. अश्विनसोबत मिळून त्याने टेस्ट मॅच ड्रॉ केली. याच दुखापतीमुळे हनुमा विहारी पुढचे काही महिने टेस्ट टीमच्या बाहेर होता.
श्रीलंकेविरुद्ध सीरीजमध्ये किती धावा?
पुजारा आणि राहणे ड्रॉप झाल्यानंतर त्याला श्रीलंकेविरुद्धच्या सीरीजमध्ये संधी मिळाली होती. पण या सीरीजमध्ये त्याने तीन इनिंगमध्ये 124 धावा केल्या. विहारीने या सीरीजमध्ये मोठी धावसंख्या केली नाही. त्यामुळे तो टीममध्ये आपली जागा पक्की करु शकला नाही. पुढे जुलै 2022 मध्ये बर्मिंघम कसोटीत इंग्लंड विरुद्ध टेस्ट सीरीजमध्ये अन्य फलंदाजांप्रमाणे तो फ्लॉप ठरला. फक्त 31 धावा केल्या.