WTC Final : लज्जास्पद पराभवानंतर Action हा फक्त देखावा? BCCI च्या कठोर निर्णयांची 5 महिन्यात निघाली हवा

| Updated on: Jun 12, 2023 | 8:39 AM

WTC Final : BCCI कडून निव्वळ धूळफेक. कॅप्टन रोहित शर्मा जे बोलला होता, तसा तो स्वत: वागला का? रोहितने असं केलं का? बीसीसीआय कॅप्टन आणि कोचच्या या मागणीकडे लक्ष देणार? जे निर्णय घेतलेत, त्याची अमलबजावणी होणार का? असे अनेक प्रश्न आहेत.

WTC Final : लज्जास्पद पराभवानंतर Action हा फक्त देखावा? BCCI च्या कठोर निर्णयांची 5 महिन्यात निघाली हवा
ind vs aus wtc final 2023
Image Credit source: BCCI
Follow us on

लंडन : सात महिन्यापूर्वी 10 नोव्हेंबर 2022 रोजी ऑस्ट्रेलियाच्या एडिलेडमध्ये इंग्लंडने टीम इंडियावर मोठा विजय मिळवला. T20 वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये इंग्लंडने टीम इंडियाला 10 विकेटने पराभूत केलं. हा एकतर्फी विजय होता. या पराभवानंतर मोठा गदारोळ झाला. सिलेक्शन कमिटीवर Action घेण्यात आली होती. सिनियर खेळाडूंना T20 मधून अनौपचारिकरित्या बाहेर करण्यात आलं. यात सर्वात महत्वाच होतं, 1 जानेवारी 2023 रोजी झालेली प्रदर्शनाची समीक्षा बैठक.

रविवारी 11 जूनला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्येही चित्र बदललं नाही. ऑस्ट्रेलियाने 209 धावांच्या मोठ्या फरकाने टीम इंडियावर विजय मिळवला. भारताने सलग दुसऱ्यांदा वर्ल्ड टेस्ट चॅम्य़िनशिपचा किताब जिंकण्याची संधी गमावली. मागच्या 10 वर्षांपासून टीम इंडिय़ाला एकही आयसीसीचा किताब जिंकता आलेला नाहीय. आता प्रश्न हा निर्माण होतो, बीसीसीआय पुन्हा समीक्षा बैठक करणार का? अशी बैठक झाली, तर त्यात काय निर्णय होतील? निर्णय झाल्यास त्याची अमलबजावणी होईल का?

निर्णय झाला पण IPL मध्ये अमलबजावणीच नाही

हे प्रश्न यासाठी विचारले जातायत कारण,1 जानेवारीच्या समीक्षा बैठकीत काही निर्णय झाले होते. बीसीसीआयचे अध्यक्ष रॉजर बिन्नी, सचिव जय शाह, कॅप्टन रोहित शर्मा, कोच राहुल द्रविड आणि त्यावेळचे मुख्य निवडकर्ते चेतन शर्मा त्या बैठकीला उपस्थित होते. या सगळ्यांनी मिळून टीम इंडियाच्या कामगिरीच पोस्ट-मार्टम केलं. काही निर्णय घेतले होते. यात सगळ्यात महत्वाचा निर्णय होता, आयपीएल दरम्यान खेळाडूंच वर्कलोड मॅनेजमेंट. हे वर्कलोड मॅनेजमेंट संपूर्ण आयपीएलमध्ये कुठे दिसलच नाही. त्याचा निकाल WTC फायनलमध्ये दिसतोय.

त्या बैठकीत काय ठरलेलं?

त्या बैठकीत प्रामुख्याने वर्ल्ड कपसाठी 20 खेळाडूंना शॉर्टलिस्ट करण्यात आलं. त्यांच्या वर्कलोड मॅनेजमेंटचा उल्लेख आहे. या लिस्टमध्ये विराट कोहली, रोहित शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शुभमन गिल, रवींद्र जडेजा सारख्या प्रमुख खेळाडूंची नाव असणं स्वाभाविक आहे. आयपीएल दरम्यान या खेळाडूंच्या वर्कलोड मॅनेजमेंटसाठी फ्रेंचायजीच्या संपर्कात रहायच होतं.

फक्त केएस भरत सोडल्यास, बाकी सर्व…..

आता प्रश्न हा आहे की, वर्कलोड फक्त वनडे वर्ल्डकपसाठीच आवश्यक होता का? त्याआधी होणारी WTC फायनल महत्वाची नव्हती का? WTC फायनलसाठी निवडलेल्या 15 सदस्यीय स्क्वॉडमध्ये फक्त चेतेश्वर पुजाराला सोडून अन्य 14 प्लेयर दोन महिने आयपीएलमध्ये खेळत होते. फक्त एकटा केएस भरत सोडल्यास जवळपास प्रत्येक खेळाडू आपआपल्या फ्रेंचायजीसाठी सर्व सामने खेळला. सततच्या क्रिकेटमुळे खेळाडू मानसिक आणि शारीरिक दृष्टया फिट राहण कठीण होतं.

प्रश्न फक्त बीसीसीआयला नाही, रोहित शर्माला सुद्धा आहे

प्रश्न फक्त बीसीसीआयला नाही, कॅप्टन रोहित शर्माला सुद्धा आहे. आयपीएल सुरु होण्याआधी रोहित शर्माने म्हटलं होतं की, “तुम्ही तुमच्या टीमकडून मॅच खेळू नका असा खेळाडूंना सांगता येऊ शकत नाही. त्यांना स्वत:ला त्यांच्या वर्कलोड मॅनेज करण्यावर लक्ष द्यावं लागेल” स्वत: रोहितने असं केलं का? रोहितने या सीजनमध्ये मुंबई इंडियन्ससाठी सर्वच्या सर्व 16 सामने खेळला. 30 मे रोजी इंग्लंडमध्ये गेला. त्याचा परिणाम फायनलमध्ये दिसला.

कॅप्टन आणि कोचचा सल्ला बीसीसीआय ऐकणार का?

त्यामुळेच बीसीसीआय पुन्हा समीक्षा बैठक करणार का? हा प्रश्न आहे. कॅप्टन रोहित आणि कोच राहुल द्रविड यांनी फायनलआधी 2-3 आठवड्याची तयारी तसेच 2-3 सराव सामने मिळाले पाहिजेत असं म्हटलय. बीसीसीआय कॅप्टन आणि कोचच्या या मागणीकडे लक्ष देणार? जे निर्णय घेतलेत, त्याची अमलबजावणी होणार का? हे सगळे प्रश्न निर्माण झालेत.