मुंबई: इंडियन प्रीमियर लीगच्या यंदाच्या हंगामात (IPL) अनेक युवा खेळाडू आपल्या प्रदर्शनाने लक्ष वेधून घेत आहेत. लखनौ सुपर जायंट्सच्या आयुष बदोनी प्रमाणे मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) तिलक वर्माही (Tilak Varma) शानदार फलंदाजीचं कौशल्य दाखवत आहे. तिलकने आज राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्यात हाफ सेंच्युरी झळकावली. आज पुन्हा एकदा हैदराबादच्या तिलक वर्माने कमालीचा खेळ दाखवला. मुंबई इंडियन्सकडून खेळणाऱ्या या युवा फलंदाजाने 33 चेंडूत 61 धावांची खेळी केली. त्याने स्फोटक फलंदाजीचं प्रदर्शन केलं. तिलकने मैदानावर चौफेर फटकेबाजी केली. तिलक वर्माने 61 धावांच्या खेळीत तीन चौकार आणि पाच षटकार लगावले. इशान शर्मा सोबत मिळून त्याने तिसऱ्या विकेटसाठी 81 धावांची भागीदारी केली. त्याने आज जबरदस्त खेळ दाखवला.
तिलकने राजस्थानच्या वेगवान आणि फिरकी गोलंदाजांचा समाचार घेतला. मागच्या सामन्यातही तिलक वर्माने आपल्या 22 धावांच्या छोटेखानी खेळीने छाप पाडली होती. मेगा ऑक्शनमध्ये तिलकचं नाव आल्यानंतर मुंबई इंडियन्सने त्याला विकत घेण्यासाठी पूर्ण ताकत पणाला लावली. 20 लाख बेस प्राइस असलेल्या तिलकला 1.70 कोटी रुपयांमध्ये विकत घेतलं. मुंबईचा निर्णय किती योग्य होता ते आज दिसून आलं.
तिलक वर्मा डावखुरा फलंदाज आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये तो हैदराबादकडून रणजी करंडक, सय्यद मुश्ताक अली टी 20 ट्रॉफी आणि विजय हजार करंडक स्पर्धेत नियमितपणे खेळत आला आहे. हैदराबादकडून ओळख निर्माण करण्याआधीच वयाच्या 17 व्या वर्षी अंडर-19 क्रिकेटमधून त्याने स्वत:ची ओळख बनवली. 2020 सालच्या अंडर 19 वर्ल्ड कप टीममध्ये तिलक वर्मा होता. यशस्वी जैस्वाल, रवी बिश्नोई, कार्तिक त्यागी सारख्या उदयोन्मुख खेळाडूंबरोबर टीम इंडियासाठी तिलक वर्मा महत्त्वाची भूमिका बजावत होता. वर्ल्ड कप तिलक वर्मासाठी फार चांगला ठरला नाही. त्याने तीन डावात फक्त 86 धावाच केल्या. त्यामुळे त्याला आयपीएलमध्ये संधी मिळाली नव्हती. त्यावेळी यशस्वी, प्रिमय गर्ग आणि बिश्नोई सारख्या खेळाडूंना होता-हात विकत घेतलं होतं.
तिलकने देशातंर्गत क्रिकेटमध्ये आपल्या खेळाचा जलववा दाखवला. मागच्या सीजनमध्ये त्याने चांगल्या धावा केल्या. 2021-22 मुश्ताक अली स्पर्धेत तिलकने 149 च्या स्ट्राइक रेटने 215 धावा केल्या. विजय हजारे करंडक स्पर्धेतही त्याने जबरदस्त फलंदाजी केली होती. यात एक शतकही होतं. 15 टी 20 सामन्यात 143 च्या स्ट्राइक रेटने 381 धावा केल्या आहेत.
Ladies & gentlemen… ????? ????? ?#OneFamily #DilKholKe #MumbaiIndians #MIvRR pic.twitter.com/ughKqIsYHZ
— Mumbai Indians (@mipaltan) April 2, 2022
तिलकला आयपीएल मेगा ऑक्शनच्या प्लॅटफॉर्म पर्यंत पोहोचवण्यात त्याच्या कोचचं मोठं योगदान आहे. तिलकचे वडील पेशाने इलेक्ट्रीशियन आहेत. रोजच्या दिवसाचा खर्च भागवताना त्यांना तिलकच्या क्रिकेट कोचिंगचा खर्च झेपणारा नव्हता. त्यावेळी तिलकच्या खर्चाची सर्व जबाबदारी त्याच्या कोचने उचलली. तिलक हैदराबादच्या चंद्रयानगुट्टा भागात रहायचा. तिथल्या गल्ल्यांमध्ये तो क्रिकेट खेळायचा. तिलकचा स्टान्स, कट आणि पुलचे फटके खूपच सुंदर आहेत.