मुंबई : सनरायजर्स हैदराबादची टीम IPL 2023 च्या सीजनमधून आधीच बाहेर गेली आहे. SRH कडे आता पुढच्या सीजनच्या तयारीचा वेळ आहे. त्यांना आपल्या स्क्वाडसाठी अशा खेळाडूंची निवड करावी लागेल, ज्यांना पुढच्या सीजनसाठी रिटेन करता येईल. SRH काही नव्या खेळाडूंना संधी देतेय. आज Vivrant Sharma नावाच्या युवा फलंदाजाला अशीच संधी मिळाली. त्याने मिळालेल्या संधीच सोनं केलं.
लीग स्टेजच्या शेवटच्या सामन्यात मुंबई इंडियन्स विरुद्ध हैदराबाद टीमने काही बदल केले. उमरान मलिकला 5 मॅचनंतर संधी मिळाली. तेच 23 वर्षाचा ऑलराऊंडर विवरांत शर्माला सुद्धा संधी दिली. विवरांतने या सीजनमध्ये आधीच डेब्यु केलाय. पहिले दोन सामने तो खेळला. पण त्याला बॅटिंगची संधी मिळाली नव्हती.
तिसऱ्याच बॉलवर कमाल
मुंबई विरुद्ध विवरांतला ओपनिंगची संधी मिळाली. विवरांतने तिसऱ्याच चेंडूवर आपलं टॅलेंट दाखवून दिलं. जेसन बेहरनडॉर्फच्या गोलंदाजीवर विवरातं पुढे आला व कव्हर्सच्या वरुन जोरदार शॉट मारत चौकार लगावला.
9 फोर 2 सिक्स
विवरांतने आक्रमक फलंदाजी सुरु ठेवली. त्याने अनुभवी लेग स्पिनर पियुष चावलाच्या बॉलिंगवर 2 ओव्हर्समध्ये 2 चौकार आणि 1 सिक्स मारला. त्याने ओपनर मयंक अग्रवालसोबत दमदार सलामी दिली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी 140 धावांची भागीदारी केली. विवरांत शर्माने 47 चेंडूत 69 धावा केल्या. यात 9 फोर 2 सिक्स आहेत.ओपनर विवरांत शर्माला मधवालने रमणदीप सिंहकरवी कॅच आऊट केलं.
त्याच्यासाठी हैदराबादने 13 पट जास्त पैसे मोजले
विवरांत शर्मा मूळचा जम्मू-काश्मीरचा आहे. आयपीएल 2023 साठी झालेल्या लिलावात सनरायजर्स हैदराबादने त्याला 2.6 कोटी रुपयांमध्ये विकत घेतलं. विवरांतवर 20 लाखापासून बोली लागण्यास सुरुवात झाली होती. हैदराबादने बेस प्राइसपेक्षा 13 पट जास्त पैसे मोजून त्याला विकत घेतलं.
देशांतर्गत स्पर्धेत कशी कामगिरी?
विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत विवरांत शर्माने 56.42 च्या सरासरीने 395 धावा केल्या होत्या. देशांतर्गत 50 ओव्हर्सच्या मॅचमध्ये त्याने उत्तराखंड विरुद्ध 124 चेंडूत 154 धावा फटकावल्या होत्या. देशांतर्गत स्पर्धेतील चांगल्या कामगिरीमुळे हैदराबादने त्याच्यासाठी इतके पैसे मोजले.