लंडन : ICC WTC Final मध्ये टीम इंडियाची स्थिती खराब आहे. मॅचचा आजचा शेवटचा दिवस आहे. टीम इंडियाला विजयासाठी 280 धावांची गरज आहे. पण या धावा करणं सोपं नाहीय. भारताला विजयासाठी 444 धावांच टार्गेट मिळालं होतं. चौथ्या दिवसाचा खेळ संपताना टीम इंडियाने 3 विकेट गमावून 164 धावा केल्या आहेत. भारताचा विजयाचा मार्ग सोपा नाहीय. 1979 साली भारतासमोर अशीच स्थिती होती. द ओव्हलचच मैदान होतं.
त्यावेळी टीम इंडिया जिंकली नव्हती, पण मॅच ड्रॉ करण्यात टीम यशस्वी ठरली होती. त्या मॅचमध्ये लिटिल मास्टर सुनील गावस्कर हिरो ठरले होते.
43 वर्षापूर्वीची आज पुनरावृत्ती होईल का?
टीम इंडियाने मॅच ड्रॉ केली, तर ट्रॉफी टीम इंडियालाच मिळेल. ओव्हलच्या विकेटवर मॅच ड्रॉ करणं सुद्धा कठीण आहे. त्यासाठी आज, टीम इंडियामध्ये कोणाला तरी सुनील गावस्कर बनावं लागेल. 43 वर्षापूर्वी गावस्कर जी इनिंग खेळले होते, तसा खेळ दाखवावा लागेल.
काय घडलेलं त्या मॅचमध्ये?
30 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर 1979 रोजी भारत आणि इंग्लंडमध्ये ओव्हलवर कसोटी सामना होता. इंग्लंडने पहिली बॅटिंग केली. त्यांनी 305 धावा केल्या. भारतीय टीम आपल्या पहिल्या डावात 202 रन्सवर ऑलआऊट झाली. इंग्लंडने दुसऱ्या डावात 8 विकेट गमावून 334 धावा केल्या. टीम इंडियाला विजयासाठी 438 धावांच टार्गेट मिळालं होतं. भारताने मॅचच्या चौथ्या दिवशी एकही विकेट न गमावता 76 धावा केल्या होत्या. अखेरच्या दिवशी टीम इंडियाला विजयासाठी 362 धावांची गरज होती.
विजयासाठी फक्त 8 धावा कमी पडलेल्या
त्या मॅचमध्ये सुनील गावस्कर यांनी जबरदस्त प्रदर्शन केलं होतं. त्यांनी शानदार इनिंग खेळली. डबल सेंच्युरी झळकवली. 443 चेंडूंचा सामना करताना 221 धावा केल्या. सुनील गावस्कर टीमला विजय मिळवून देऊ शकले नाही, टीमला विजयासाठी 8 धावा कमी पडल्या होत्या. भारताने हा सामना ड्रॉ केला होता.
आज काहीशी अशीच स्थिती आहे. टीम इंडियाला विजयासाठी 444 धावांच टार्गेट मिळालं. चौथ्या दिवस अखेर टीम इंडियाची स्थिती 3 बाद 164 आहे. विराट कोहली 44 आणि अजिंक्य रहाणे 20 धावांवर नाबाद आहे. टीम इंडियाला विजयासाठी 280 धावांची गरज असून 7 विकेट शिल्लक आहेत.