मुंबई: आयपीएल 2022 (IPL 2022) मध्ये रविवारी दोन सामने खेळले जाणार आहेत. पहिला सामना पंजाब किंग्स आणि सनरायजर्स हैदराबादमध्ये (PBKS vs SRH) होणार आहे. पंजाब किंग्सने मागच्या सामन्यात मुंबई इंडियन्सला नमवून गुणतालिकेत आपली स्थिती बळकट केली होती. तेच सनरायजर्स हैदराबादने शुक्रवारी कोलकाता नाइट रायडर्स (KKR) विरुद्ध विजय मिळवला. SRH ने विजयाची हॅट्ट्रिक साजरी केली. हैदराबादची या सीजनची सुरुवात चांगली झाली नव्हती. त्यांना सुरुवातीच्या दोन सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता. पण त्यांनी चांगलं कमबॅक करत, सलग विजय मिळवले आहेत. आता या संघासमोर पंजाबचं कडव आव्हान आहे. नवी मुंबईच्या डी.वाय.पाटील स्टेडियमवर हा सामना होणार आहे. पंजाबची टीम गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे. पाच पैकी तीन सामने त्यांनी जिंकले असून दोन मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला आहे.
हैदराबादची सुद्धा हीच स्थिती आहे. पण नेट रनरेटमध्ये ते पिछाडीवर आहेत. त्यामुळे सातव्या क्रमांकावर आहेत. केन विलियमसनच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या सनरायजर्स हैदराबादची नजर विजयी चौकार मारण्यावर असेल. गुणतालिकेत वरच्या स्थानावर जाण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. पंजाबची नजरही तिसऱ्या स्थानावरुन अजून वरती जाण्याकडे असेल.
सनरायजर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्समध्ये आतापर्यंत झालेल्या सामन्यांवर नजर टाकली, तर हैदराबादची बाजू वरचढ आहे. आतापर्यंत दोन्ही संघांमध्ये एकूण 18 सामने झालेत. यात 12 मॅचेस हैदराबादने जिंकल्या आहेत. सहा सामन्यात पंजाबने विजय मिळवला आहे. पंजाबची टीम यंदा चांगल्या फॉर्ममध्ये दिसत आहे. हैदराबादच्या टीमलाही सूर गवसला आहे.
दोन्ही टीम्समधील मागच्या पाच सामन्यांवर नजर टाकली, तरी हैदराबादचीच बाजू वरचढ दिसते. मागच्या पाच पैकी तीन सामने हैदराबादने तर दोन पंजाबने जिंकेल आहेत. 25 सप्टेंबर 2021 रोजी झालेल्या सामन्यात पंजाबने विजय मिळवला होता. हैदराबादला 21 एप्रिलच्या मॅचमध्ये विजय मिळाला होता. 24 ऑक्टोबर 2021 च्या सामन्यात पंजाब किंग्सने विजय मिळवला होता. आठ ऑक्टोबर 2020 आणि 29 एप्रिल 2019 च्या सामन्यात हैदराबाने विजय मिळवला होता. या आकड्यांमुळे एसआरएच दिलासा मिळेल पण पंजाबची चिंता मात्र नक्की वाढेल.