रोसेऊ : एका दगडात दोन पक्षी, ही म्हणं तुम्ही ऐकली असेल. याचा अर्थही तुमच्या लक्षात येतो. डॉमिनिका टेस्टमध्ये अश्विनने सुद्धा हेच केलं. त्याने आपल्या चेंडूचे बाण वेस्ट इंडिजवर चालवले. त्याचवेळी स्वत:च्या टीमवरही निशाणा साधला. सोप्या शब्दात सांगायच झाल्यास अश्विन फक्त वेस्ट इंडिज नाही, तर टीम इंडियाशी सुद्धा लढतोय. या दोन्ही आघाड्यांवर अश्विनचीच बाजू वरचढ आहे.
तुम्ही म्हणाल, वेस्ट इंडिजशी अश्विनच लढणं समजू शकतो, पण टीम इंडियाच काय?. हे समजून घेण्यासाठी तुम्हाला फ्लॅश बॅकमध्ये जावं लागेल. इंग्लंडमध्ये झालेल्या WTC 2023 च्या फायनलमध्ये टीम मॅनेजमेंटने अश्विनला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान दिलं नव्हतं. प्लेइंग इलेव्हनमध्ये कॅप्टन रोहित शर्माने अश्विनपेक्षा शार्दुल ठाकूरला प्राधान्य दिलं होतं. सहाजिकच या निर्णयावर अनेक प्रश्न निर्माण झाले.
अजून भरपूर क्रिकेट बाकी
आता वेस्ट इंडिज दौऱ्यात अश्विनला संधी मिळाली, तेव्हा त्याच्यामध्ये अजून किती क्रिकेट बाकी आहे ते दाखवून दिलं. अश्विनने डॉमिनिका टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्ये वेस्ट इंडिजचे 5 विकेट काढले. सोबतच अश्विनने काही रेकॉर्डही केले.
अश्विनने इंग्लंडच्या कुठल्या गोलंदाजाला मागे टाकलं?
डॉमिनिका टेस्टमध्ये 5 विकेट घेऊन अश्विनने काही रेकॉर्ड केले. त्याने 24.5 ओव्हरमध्ये 60 धावा देऊन 5 विकेट काढले. टेस्ट क्रिकेटमध्ये अश्विनची 5 विकेट घेण्याची ही 33 वी वेळ आहे. त्याने इंग्लंडच्या जेम्स अँडरसनला मागे टाकलं. एंडरसनने हा कारनामा 32 वेळा केलाय. अश्विन सर्वाधिकवेळा 5 विकेट घेणारा सहावा गोलंदाज बनलाय.
किती हजार चेंडूत अश्विनने 700 विकेट काढले?
याच मॅचमध्ये अश्विनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 700 विकेट पूर्ण करणारा तिसरा गोलंदाज बनला. अल्जारीज जोसेफ अश्विनचा 700 वा विकेट ठरला. अश्विनने टेस्ट करियरच्या 351 व्या इनिंगमध्ये ही कमाल केलीय. मुरलीधरन नंतर सर्वाधिक कमी इनिंगमध्ये 700 विकेट घेणारा दुसरा गोलंदाज अश्विन आहे. अश्विनने 32,278 चेंडूत 700 आंतरराष्ट्रीय विकेट पूर्ण केले.
अश्विनने एका दगडात मारले दोन पक्षी
असे रेकॉर्ड ज्या खेळाडूच्या नावावर आहेत, त्याला प्रतिस्पर्धी टीम घाबरणारच. वेस्ट इंडिजची हालत सुद्धा अशीच होती. अश्विनच्या कामगिरीमुळे पहिल्याच दिवशी वेस्ट इंडिजची वाटचाल पराभवाच्या दिशेने सुरु झालीय. सोबतच त्याने भारतीय टीम मॅनेजमेंटला सणसणीत प्रत्युत्तर दिलं आहे. कंडीशन्सच कारण देऊन जे अश्विनला प्लेइंग इलेव्हनच्या बाहेर ठेवतात.