गुयाना : वेस्ट इंडिज दौऱ्यावर टीम इंडियाने जोरदार सुरुवात केली होती. पण आता परिस्थिती बदलली आहे. काही प्रमुख खेळाडूंशिवाय T20 सीरीज खेळणाऱ्या हार्दिक पांड्याच्या टींमचा सलग दुसरा पराभव झाला आहे. त्रिनिदादमधील पहिल्या सामन्यानंतर गुयाना येथील दुसऱ्या T20 सामन्यातही टीम इंडियाची बॅटिंग फ्लॉप ठरली. टीम इंडियाचा 2 विकेटने पराभव झाला. 5 T20 सामन्याच्या सीरीजमध्ये टीम इंडिया 0-2 ने पिछाडीवर पडली आहे.
टीम इंडियाच्या पराभवासाठी फलंदाजांना जबाबदार ठरवणं चुकीच नाहीय. यामध्ये काही चुकीचे निर्णय घेऊन कॅप्टन हार्दिक पांड्याने सुद्धा हातभार लावला.
तोच कित्ता गिरवता आला नाही
चार वर्षांपूर्वी प्रोविडेंस स्टेडियममध्ये टीम इंडिया पहिल्यांदा मॅच खेळली होती. या सामन्यात विजय मिळवला होता. रविवारी 6 ऑगस्ट रोजी टीम इंडिया दुसऱ्यांदा या स्टेडियममध्ये उतरली. पण यावेळी त्यांना तोच कित्ता गिरवता आला नाही. पहिली बॅटिंग करताना टीम इंडिय़ाने फक्त 152 धावा केल्या. तिलक वर्माने सर्वाधिक 51 धावा केल्या. गोलंदाजांनी जोरदार प्रयत्न करुनही टीम इंडियाने 2 विकेटने सामना गमावला.
त्याला गोलंदाजी का नाही दिली?
कॅप्टन हार्दिक पांड्याचे दोन निर्णय चुकले. ते सुद्धा टीमच्या पराभवाचा कारण आहे. दोन्ही निर्णय गोलंदाजांच्या वापराशी संबंधित आहेत. टीम इंडिया या सामन्यात 6 गोलंदाजांसह उतरली होती. पण गोलंदाजी फक्त 5 जणांनी केली. वेस्ट इंडिज विरुद्ध अक्षर पटेलला गोलंदाजीची संधी मिळालीच नाही. वेस्ट इंडिजने चौथ्या ओव्हरमध्ये 32 धावात 3 विकेट गमावले होते.
हार्दिकने काय कारण दिलं?
वेस्ट इंडिजकडून पूरनने आक्रमक बॅटिंग केली. हार्दिकने अक्षरचा वापर न करण्यासाठी हेच कारण सांगितलं. डावखुरा फलंदाज पूरन ज्या पद्धतीची बॅटिंग करत होता, त्यामुळे स्पिनर्सना रोटेट करण्यात अडचणी आल्या, असं हार्दिकने सांगितलं.
…तेव्हा पॉवेल सुद्धा क्रीजवर होता
लेफ्टी बॅट्समन क्रीजवर चांगला खेळत होता, म्हणून लेफ्टी बॉलरला संधी दिली नाही, असं हार्दिकच म्हणणं आहे. पण त्याचवेळी रायटी बॅट्समन रोव्हमॅन पॉवेल सुद्धा क्रीजवर होता. दोघांनी 6 ओव्हर्समध्ये 57 धावांची भागीदारी केली.
चहलमुळे पुनरागमन
टीम इंडिया मॅचमध्ये पुनरागमन करताना दिसत होती, त्यावेळी हार्दिक पांड्याने चूक केली. 16 व्या ओव्हरमध्ये टीम इंडियाला 3 विकेट मिळाले होते. यात 2 विकेट लेग स्पिनर युजवेंद्र चहलने काढले होते. चहलने आपल्या लेगस्पिनच्या जाळ्यात जेसन होल्डर आणि शिमरॉन हेटमायर या वेस्ट इंडिजच्या फलंदाजांना फसवलं. त्या ओव्हरमध्ये चहलने फक्त 2 धावा दिल्या.
मग हार्दिकने त्याला चौथी ओव्हर का नाही दिली?
वेस्ट इंडिजच्या 129 धावांवर 8 विकेट होत्या. 24 चेंडूत 24 धावांची गरज होती. त्यांचे 2 विकेट शिल्लक होते. चहल चांगली गोलंदाजी करत होता. मात्र, तरीही हार्दिकने त्याला चौथी ओव्हर दिली नाही. चहलच्या फिरकीच्या जाळ्यात अल्जारी जोसेफ आणि अकील होसैन फसले असते. चहलने आपल्या 3 ओव्हरमध्ये 19 धावात 2 विकेट घेतल्या होत्या. वेस्ट इंडिजने 19 व्या ओव्हरमध्ये मॅच जिंकली.