फ्लोरिडा : टीम इंडियासाठी वेस्ट इंडिज विरुद्ध T20 सीरीजची सुरुवात निराशाजनक झाली होती. सलग दोन सामन्यात टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण होत होतं. कोच राहुल द्रविड यांच्या स्ट्रॅटजीवरही शंका घेतली जात होती. आज रविवारी 13 ऑगस्टला पाच सामन्यांच्या सीरीजमधील शेवटचा सामना खेळला जाणार आहे. ही निर्णायक मॅच असणार आहे. सीरीज विनर कोण? ते ठरणार आहे. दरम्यान टीम इंडियाने इतकं दमदार कमबॅक कसं केलं? हा अनेकांच्या मनात प्रश्न आहे.
शनिवारी 12 ऑगस्टला फ्लोरिडामध्ये झालेल्या चौथ्या टी 20 सामन्यात टीम इंडियाने वेस्ट इंडिजवर 9 विकेट राखून विजय मिळवला. वेस्ट इंडिजने पहिली बॅटिंग केली. त्यांनी 8 विकेट गमावून 178 धावा केल्या.
18 चेंडू आधीच विजय
प्रत्युत्तरात टीम इंडियाकडून यशस्वी जैस्वाल आणि शुभमन गिल यांनी स्फोटक बॅटिंग केली. फक्त 1 विकेट गमावून टीम इंडियाने विजय मिळवला. टीम इंडियाने 18 चेंडू आधीच विजय मिळवला. सीरीजमध्ये 2-2 अशी बरोबरी साधली आहे. पहिल्या मॅचमध्ये टीम इंडियाला विजयसाठी फक्त 150 धावा हव्या होत्या. पण टीमने फक्त 145 धावा केल्या. दुसऱ्या मॅचमध्ये पहिली बॅटिंग केली आणि 152 धावा केल्या. वेस्ट इंडिजने विजयी लक्ष्य गाठलं. मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली.
सलग दोन विजयांसह रिझल्ट सर्वांसमोर
दुसऱ्या पराभवानंतर हार्दिक पांड्याने जाहीरपणे फलंदाजीवर नाराजी व्यक्त केली. आमची समाधानकारक बॅटिंग झाली नाही, असं हार्दिक म्हणाला होता. तिसऱ्या T20 आधी हार्दिकने फलंदाजांना चॅलेंज दिलं. कोणाला तरी, पुढे येऊन जबाबदारी घ्यावी लागेल असं हार्दिक म्हणाला होता. हार्दिकच्या त्या स्टेटमेंटचा परिणाम दिसला. भारतीय फलंदाजीत जान आली. सलग दोन विजयांसह रिझल्ट सर्वांसमोर आहे.
सूर्यकुमार यादवचा काऊंटर अटॅक
टीम इंडियाची गोलंदाजी चांगली सुरु होती. तिसऱ्या टी 20 पर्यंत हा सिलसिला कायम राहिला. गुयाना येथे सामना झाला. त्यावेळी टीम इंडियाच्या बॉलर्सनी वेस्ट इंडिजला 159 धावांवर रोखलं. त्या मॅचमध्ये शुभमन गिल आणि यशस्वी जैस्वालची ओपनिंग जोडी फ्लॉप ठरली होती. मात्र सूर्यकुमार यादवने काऊंटर अटॅक करुन टीम इंडियाचा विजय सुनिश्चित केला. सूर्या आणि तिलक वर्माने 87 धावांची भागीदारी केली होती.