नवी दिल्ली : भारताला आपल्या दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाने दिलेलं लक्ष्य गाठायचं आहे. भारत किती लक्ष्य गाठेल हे अद्याप कुणालाही माहीत नाही. मात्र, त्यापेक्षा टीम इंडियाला दुसरीच डोकेदुखी सतावत आहे. अजिंक्य राहणे दुसऱ्या इनिंगमध्ये खेळणार की नाही? असा प्रश्न टीम इंडियाला सतावत आहे. त्याला कारणही तसंच आहे. अजिंक्य राहणे दुखापतग्रस्त झाला आहे. एक खंदा आणि भरवश्याचा खेळाडूच जायबंदी झाल्याने आणि तो खेळण्याची शाश्वती नसल्याने टीम इंडियाच्या तोंडचं पाणी पळालं आहे.
तुम्ही म्हणाल अजिंक्य राहणे कधी दुखापतग्रस्त झाला? पहिल्या डावात फलंदाजी करताना अजिंक्य राहणे जखमी झाला होता. पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिंस 22 वं षटक टाकण्यासाठी आला होता. त्यावेळी या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर खेळताना अजिंक्य राहणेच्या बोटाला दुखापत झाली. त्यानंतर तो बोटाला टेप लावून खेळत होता. मात्र, खेळताना त्याला प्रचंड वेदना जाणवत होत्या. वेदना जाणवत असतानाही त्याने निर्धाराने आणि टिच्चून फलंदाजी केली.
ही दुखापत झाल्यानंतर त्यावर आता अजिंक्य राहणे यानेच माहिती दिली आहे. दुसऱ्या डावात मी खेळूच शकणार नाही इतकी मोठी दुखापत झालेली नाही, असं अजिंक्य राहणे याने म्हटलं आहे. पण तो खेळणार की नाही हे थेट स्पष्ट केलं नाही. मात्र, त्याला झालेली दुखापत फार गंभीर नसल्याचंही त्याच्या विधानातून स्पष्ट होत आहे. त्यामुळे डॉक्टर काय सल्ला देतात याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.
WTC Final फायनलच्या पहिल्या डावात अजिंक्य राहणे याने 129 चेंडूत 11 चौकार आणि एका षटकाराच्या सहाय्याने 89 धावा कुटल्या होत्या. त्याला या डावात शतकी खेळी करता आली नाही. मात्र, कसोटी क्रिकेटमध्ये पाच हजार धावा पूर्ण करण्याचा विक्रम त्याच्या नावावर जमा झाला आहे. विशेष म्हणजे कसोटी क्रिकेटमध्ये अजिंक्यचं 18 महिन्यानंतर पुनरागमन झालं आहे. मात्र, पुनरागमन होताच अजिंक्यने तडाखेबंद फलंदाजी करत आपला फॉर्म कायम असल्याचं दाखवून दिलं आहे. तसेच आपणच टीम इंडियाचे संकटमोचक असल्याचंही त्याने दाखवून दिलं आहे.
मोठी खेळी केल्यानंतरही अजिंक्यने आपण आपल्या फलंदाजीवर समाधानी नसल्याचं म्हटलं आहे. 320 ते 330 धावा बनविण्याचा आपला प्लॅन होता. मात्र, तसं होऊ शकलं नाही. कारण गोलंदाजीसाठी कालचा दिवस चांगला होता, असं त्याने म्हटलं आहे.