मुंबई: महिला IPL पुढच्यावर्षी सुरु होणार, पण कधी? या प्रश्नाचं उत्तर लवकरच मिळू शकतं. BCCI वर्ष 2023 मध्ये महिला खेळाडूंमध्ये खेळल्या जणाऱ्या WIPL साठी दोन विंडोंवर विचार करत आहे. पहिली विंडो मार्च 2023 ची आहे, तर दुसरी विंडो सप्टेंबरची. बोर्डाची पहिली पसंती मार्चवाल्या विंडोला आहे. जर असं झालं, तर महिलांच्या 6 टीम्स तुम्हाला आयपीएलमध्ये खेळताना दिसू शकतात. महिला आयपीएलची प्रतिक्षा मार्च 2023 मध्ये संपण्याची शक्यता आहे. BCCI ने काही महिन्यांपूर्वी घोषणा केली होती की, मार्च मध्ये WIPL स्पर्धा खेळली जाईल. नुकतीच आयपीएलस सुरु असताना महिलांची T 20 चॅलेंज स्पर्धा पुण्यात संपन्न झाली. हे सामने पाहण्यासाठी बऱ्यापैकी प्रेक्षकांची उपस्थिती होती. सुपरनोवा आणि वेलोसिटी या दोन संघांमध्ये झालेली फायनल पाहण्यासाठी 8621 प्रेक्षक उपस्थित होते. यातून महिला क्रिकेटची वाढणारी लोकप्रियता दिसते.
WIPLच्या आयोजनासाठी BCCI ची जोरदार तयारी सुरु आहे. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड क्रिकेट बोर्डाच्या ते संपर्कात आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेट काउन्सिल बरोबरही मार्चच्या विंडोबद्दल बोलू शकतात. कॅरेबियन प्रीमियर लीग, द हण्ड्रेड आणि वुमेन्स बिग बॅशचं आयोजन जुलै ते नोव्हेंबर दरम्यान होतं. या महिला टी 20 स्पर्धा आहेत. BCCI मार्च मध्ये WIPL आयोजनावर भर देत आहे. जेणेकरुन ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकेचे खेळाडू उपलब्ध राहू शकतात.
मार्च 2023 मध्ये WIPL चे आयोजन करण्यास BCCI ला अन्य बोर्डांचाही पाठिंबा आहे. म्हणजे त्यांचे खेळाडू या लीगमध्ये खेळण्यासाठी उपलब्ध असतील. WIPL साठी बीसीसीआय 6 टीम्स बनवणार आहे. IPL फ्रेंचायजींनी पण WIPL चे संघ विकत घेण्याचा विचार केला आहे. कोलकाता नाइट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स या दोन फ्रेंचायजी महत्त्वाच्या आहेत.