WPL 2023 : हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सला महिला प्रीमियर लीगमध्ये पराभवाचा पहिला धक्का दिला. मुंबईने दिल्लीला 8 विकेटने हरवून विजयाची हॅट्ट्रीक केली. या मॅचनंदर ऑरेंज आणि पर्पल कॅपच्या शर्यतीत दिल्लीची कॅप्टन मेग लेनिंग आणि मुंबईची नवोदीत खेळाडू सायका इसाकचा दबदबा आहे. लेनिंगने मुंबई विरुद्ध 41 चेंडूत 43 धावा ठोकल्या. तीन सामन्यात लेनिंगच्या नावावर आता 185 धावा आहेत. तिने आतापर्यंत 2 अर्धशतक झळकावली आहेत. लेनिंग लीगमध्ये सर्वाधिक धावा बनवणारी फलंदाज आहे. त्यामुळे ऑरेंज कॅप तिच्याकडे आहे.
लेनिंगने अंतर अजून वाढवलं
तिला मुंबई इंडियन्सच्या हॅली मॅथ्यूजकडून टक्कर मिळतेय. मॅथ्यूज 156 धावांसह ऑरेंज कॅपच्या शर्यतीत दुसऱ्या स्थानावर आहे. लेनिंगने दोघींमधील अंतर अजून वाढवलय.
मुंबईच्या मुलीची कमाल
पर्पल कॅप मुंबई इंडियन्सची गोलंदाज सायका इसाककडे आहे. लीगच्या सुरुवातीपासूनच सायकाकडे पर्पल कॅप आहे. 3 मॅचमध्ये तिने 9 विकेट घेतल्यात. 2 वेळा तिने 3 पेक्षा जास्त विकेट घेतलेत. तिला मॅथ्यूजकडून आव्हान मिळतय. मॅथ्यूज 6 विकेटसह पर्पल कॅपच्या शर्यतीत दुसऱ्या नंबरवर आहे.
मुंबईने रोखला दिल्लीचा विजय रथ
दरम्यान वूमन्स प्रीमिअर लीग स्पर्धेतील सातवा सामना मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिट्ल्स यांच्यात झाला. प्रथम बॅटींग करणाऱ्या दिल्ली कॅपिट्ल्सचा डाव मुंबईने अवघ्या 105 धावांवर गुंडाळला. दिल्लीच्या या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबई संघाने 15 ओव्हरमध्ये टार्गेट पूर्ण करत 8 विकेट्सने विजय मिळवला. मुंबईकडून यास्तिका भाटियाने सर्वाधिक 41 धावा करत संघाच्या विजयामध्ये मोलाची भूमिका बजावली. दोन्ही संघांनी दोन सामने जिंकले होते. मात्र आता सलग तिसरा विजय साकारत मुंबई इंडियन्सने दिल्लीचा विजयरथ रोखला आहे.