मुंबई: IPL 2022 स्पर्धा सुरु असताना कालपासून वुमेन्स टी 20 चॅलेंज (Women’s T20 Challenge) स्पर्धेला सुरुवात झाली आहे. सुपरनोवाज आणि ट्रेलब्लेजर्समध्ये (Supernovas vs Trailblazers) पहिला सामना झाला. पहिल्या सामन्यात सुपरनोवाजने दमदार प्रदर्शन करत ट्रेलब्लेजर्सवर विजय मिळवला. उत्तम गोलंदाजीच्या बळावर सुपरनोवाजने 49 धावांच्या फरकाने हा सामना जिंकला. प्रथम फलंदाजी करताना सुपरनोवाजने 163 धावा केल्या. स्पर्धेच्या इतिहासातील ही सर्वाधिक धावसंख्या आहे. या धावसंख्येचा पाठलाग करताना ट्रेलब्लेजर्सला चांगली सुरुवात मिळाली होती. पण सुपरनोवाजच्या गोलंदाजांनी अप्रतिम गोलंदाजी करत, ट्रेलब्लेजर्सचा डाव 114 धावांवर संपुष्टात आणला. पूजा वस्त्राकरची शानदार गोलंदाजी आणि दमदार कॅचेसच्या बळावर सुपरनोवाजने विजय मिळवला.
ट्रेलब्लेजर्ससमोर रेकॉर्ड धावसंख्येचा यशस्वी पाठलाग करण्याचं आव्हान होतं. टीमची कॅप्टन स्मृती मांधना (34) धावा, वेस्ट इंडिजच्या हॅली मॅथ्यूजने (18) चांगली सुरुवात दिली. दोघांनी पाच ओव्हर्समध्ये 39 धावा केल्या. दोन्ही सलामीवीर आठव्या षटकापर्यंत बाद झाले. दोघींना पूजा वस्त्राकरने पॅव्हेलियनमध्ये पाठवलं. स्मृती मांधना आऊट होताच ट्रेलब्लेजर्सचा सगळा डाव गडगडला. पूजाने आठव्या ओव्हरमध्ये स्मृती आणि सोफिया डंकलीचा विकेट मिळवला. पूजाने आपल्या टी 20 करीयरमधील सर्वोत्तम प्रदर्शन केलं. तिने 4 ओव्हरमध्ये 12 रन्स देत 4 विकेट घेतल्या.
सुपरनोवाज टीमची कॅप्टन हरमनप्रीत कौरने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सुपरनोवाजने प्रथम फलंदाजी करताना 163 धावा केल्या आहेत. प्रिया पुनिया (22) आणि डिएंड्रा डॉटिनने आज चांगली सुरुवात करुन दिली. पाच ओव्हर्समध्ये दोघींनी धावफलकावर 50 धावा लावल्या होत्या. पण एक चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात शर्मिन अख्तरने केलेल्या अचूक बुलेट थ्रो वर डिएंड्रा डॉटिन रनआऊट झाली. तिने 17 चेंडूत 32 धावा कुटल्या. यात पाच चौकार आणि एक षटकार होता.
दोन्ही सलामीवीर तंबूत परतल्यानंतर हरलीन देओल आणि कॅप्टन हरमनप्रीत कौरने महत्त्वपूर्ण भागीदारी केली. हरलीनने फटकेबाजी करताना 19 चेंडूत 35 धावा फटकावल्या. याक पाच चौकार आहेत. हरमनप्रीत 37 धावांवर रनआऊट झाली. 29 चेंडूत 37 धावांची खेळी करणाऱ्या हरमनप्रीतने चार चौकार लगावले.