महिला वर्ल्डकप स्पर्धेच्या 17 व्या सामन्यात वेस्ट इंडिजने बांग्लादेशला नमवलं. वेस्ट इंडिजने फक्त चार धावांनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजच्या संघाने फक्त 140 धावा केल्या. खरंतर बांग्लादेशसाठी हे लक्ष्य खूपच सोपं होतं. पण वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांनी जबरदस्त गोलंदाजी करुन बांग्लादेशला 136 धावांवर रोखलं. वेस्ट इंडिजने आपल्या तिन्ही सामन्यात रोमांचक विजय मिळवला आहे. बांग्लादेश विरुद्धच्या विजयाने गुणतालिकेत त्यांना विशेष फायदा झाला आहे. (PC-ICC)
वेस्ट इंडिजच्या महिला संघाने वर्ल्ड कपमध्ये तीन विजय मिळवले असून गुणतालिकेत ते सहा गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहेत. भारतीय संघाचे चार गुण आहेत. गुणतालिकेत भारताच्या क्रमवारीत एका स्थानाची घसरण झाली आहे. भारत चौथ्या नंबरवर आहे. (PC-ICC)
ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका चार-चार सामने जिंकून पहिल्या आणि दुसऱ्या नंबरवर आहेत. न्यूझीलंड पाच सामन्यात दोन विजयांसह पाचव्या, इंग्लंड दोन विजयांसह सहाव्या, बांग्लादेश एक विजयासह सातव्या आणि पाकिस्तान सर्व चारही सामने गमावून शेवटच्या स्थानावर आहे. (PC-ICC)
वेस्ट इंडिजच्या विजयामुळे भारताच्या अडचणी वाढणार आहेत. बांग्लादेशने हा सामना जिंकला असता, तर वेस्ट इंडिजचे फक्त चार पॉईंटसच राहिले असते. अशा परिस्थिती भारत तिसऱ्या स्थानावरच राहिला असता. आगामी तीन पैकी एका सामन्यात मोठा विजय मिळवून नेट रनरेटमध्ये सुधारणा करता आली असती. आता टीम इंडियाला ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेपैकी एका संघावर विजय मिळवून बांग्लादेशवर मोठ्या फरकाने विजय मिळवावा लागेल. (PC-AFP)
भारताचा पाचवा सामना शनिवारी ऑस्ट्रेलिया विरुद्ध आहे. ऑस्ट्रेलिया या स्पर्धेत अजूनपर्यंत अजिंक्य आहे. भारताला विजय मिळवायचा असेल, तर आतापर्यंतचं सर्वोत्तम क्रिकेट खेळावं लागेल. टीम इंडियाने 2017 वर्ल्ड कपच्या उपांत्यफेरीत ऑस्ट्रेलियावर विजय मिळवला होता. संघालाच त्याच मॅचमधून प्रेरणा घ्यावी लागेल. (PC-ICC)