मुंबई: भारतीय महिला संघाचा उद्या क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेत (ICC Womens world cup 2022) महत्त्वाचा सामना आहे. मिताली राजच्या (Mithali Raj) नेतृत्वाखाली टीम इंडिया ऑस्ट्रेलियाशी भिडणार आहे. वर्ल्डकपमधील आव्हान टिकवून ठेवण्याच्या दृष्टीने उद्याची लढत महत्त्वाची आहे. आज वेस्ट इंडिजने बांग्लादेशवर विजय मिळवल्यामुळे भारताचा वर्ल्ड कप मधील मार्ग थोडा खडतर झाला आहे. आतापर्यंत झालेल्या वर्ल्डकपच्या चार सामन्यात भारताने दोन सामने जिंकलेत, तर दोन सामन्यात पराभव झाला आहे. वर्ल्ड कपच्या एका सामन्यात एक टीम एक दिवस सर्वोच्च धावसंख्या नोंदवते आणि दुसऱ्याच सामन्यात 17 वर्षातील नीचांकी धावसंख्या नोंदवते. स्मृती मानधनाच्या (Smriti Mandhana) मते त्यावर काही स्पष्टीकरण असूच शकत नाही. एक गोष्ट मात्र स्पष्ट आहे की, वर्ल्ड कपमध्ये भारताच्या फलंदाजीत सातत्याचा अभाव आहे. याआधी वर्ल्डकप स्पर्धांमध्येही फलंदाजीत असाच सातत्याचा अभाव दिसून आला होता.
तर मी ड्रेसिंग रुममध्ये चर्चा केली असती
“फलंदाजीत सातत्याचा अभाव या विषयावर माझ्याकडे काही स्पष्टीकरण असते, तर ड्रेसिंग रुममध्ये मी त्यावर चर्चा केली असती” असे स्मृती मानधना ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्याच्या पूर्वसंध्येला म्हणाली. वेस्ट इंडिज विरुद्धच्या सामन्यात भारतीय महिला संघाने 317 धावांचा डोंगर उभा केला. त्यानंतर इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात भारतीय संघ 134 धावात ढेपाळला. फलंदाजीत सातत्याचा अभाव असल्याच या दोन सामन्यातील धावसंख्येतून दिसून येतं. आणखी एखाद-दुसऱ्या पराभवामुळे भारताचे वर्ल्ड कपमधील आव्हान लीग स्टेजमध्येच संपुष्टात येऊ शकते.
ऑस्ट्रेलियाचं विजयी अभियान रोखण्याची ताकत भारतामध्येच
ऑस्ट्रेलियाविरुद्ध आम्ही चांगली कामगिरी करुन दाखवू असा विश्वास स्मृती मानधनाने व्यक्त केला. “शनिवारी फलंदाज सर्वोत्कृष्ट कामगिरी करतील असा मला विश्वास आहे. आमचे गोलंदाज चांगली कामगिरी करत आहेत. त्यांना फलंदाजांकडून चांगली साथ मिळाली पाहिजे” असे स्मृती मानधना म्हणाली. ऑस्ट्रेलिया चार सामन्यात चार विजयासह अजेय आहे. ऑस्ट्रेलियाचं विजयी अभियान कुठला संघ रोखू शकतो, तर तो भारतच आहे.
सेट झालेल्या फलंदाजावर जास्त जबाबदारी
आम्ही लागोपाठ विकेट गमावतोय, त्यावर काहीतरी मार्ग शोधून काढला पाहिजे असे मानधना म्हणाली. “पन्नास षटकाच्या सामन्यात चांगली भागीदारी झाली पाहिजे. आम्हाला त्यावर काम करायचं आहे. तुम्ही चेंडू व्यवस्थित खेळून काढताय हे लक्षात आल्यानंतर सेट झालेल्या फलंदाजाने डाव पुढे नेला पाहिजे” असे स्मृती म्हणाली.
मिताली राज कधी धावा करणार?
भारतीय फलंदाजांना एक युनिट म्हणून चांगली कामगिरी करुन दाखवता आलेली नाही. कॅप्टन मिताली राज आणि दीप्ती शर्माला पहिल्या चार सामन्यात अपेक्षित योगदान देता आलेले नाही. स्मृती आणि हरमनप्रीत कौरचा फॉर्म संघासाठी चांगले संकेत आहेत. दोघांनी वेस्ट इंडिज विरुद्ध शतक झळकावलं होतं. आपला 200 वा वनडे सामना खेळण्याची तयारी करणारी अनुभवी वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामीने तीन सामन्यात प्रभावी कामगिरी केली आहे. डावखुरी फिरकी गोलंदाज राजेश्वरी गायकवाडनेही चांगली कामगिरी केली आहे.