जानेवारी 2022 मध्ये क्रिकेटचा थरार, जगभरातील रसिकांसाठी पर्वणी, शेड्यूल पाहून सामने पाहण्याचा प्रोग्राम ठरवा
जानेवारी 2022 मध्ये तुम्हाला अनेक क्रिकेट स्पर्धा पाहायला मिळतील. त्यातल्या कोणत्या स्पर्धा पाहायला हव्यात, कोणत्या मालिका तुमचं सर्वाधिक मनोरंजन करतील, याबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
1 / 10
आजपासून 2022 हे वर्ष सुरु झालं आहे आणि या नवीन वर्षातही क्रिकेटचा रोमांच पाहायला मिळणार आहे. जानेवारी महिन्यात तर फक्त क्रिकेटच क्रिकेट पाहायला मिळणार आहे. इतके सामने आणि मालिका पाहण्यासाठी तुम्हाला वेळदेखील मिळणार नाही. जानेवारीत अनेक क्रिकेट स्पर्धा पाहायला मिळतील. त्यातल्या कोणत्या स्पर्धा पाहायला हव्यात, कोणत्या मालिका तुमचं सर्वाधिक मनोरंजन करतील, याबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
2 / 10
बांगलादेशचा न्यूझीलंड दौरा : 2022 ची सुरुवात बांगलादेश आणि न्यूझीलंड यांच्यात खेळवल्या जाणार्या पहिल्या कसोटी सामन्याने होईल. उभय संघांमधील मालिकेतील पहिला सामना 1 ते 5 जानेवारी दरम्यान खेळवला जात आहे. यानंतर मालिकेतील दुसरी आणि शेवटची कसोटी 9 ते 13 जानेवारी दरम्यान क्राइस्टचर्च येथे होणार आहे.
3 / 10
भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा : भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर आहे, जिथे टीम इंडियाला 3 कसोटी आणि 3 एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळायची आहे. दोन्ही देशांदरम्यान सध्या कसोटी मालिका खेळवली जात आहे, त्यातील पहिला सामना 2021 मध्ये 26-30 डिसेंबर दरम्यान खेळला गेला. पण आता उर्वरित सामने जानेवारी 2022 मध्ये होतील. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी मालिकेतील दुसरा सामना 3 ते 7 जानेवारी दरम्यान जोहान्सबर्ग येथे तर तिसरा आणि शेवटचा सामना 11 ते 15 जानेवारी दरम्यान केपटाऊनमध्ये खेळवला जाईल. कसोटीनंतर 19, 21 आणि 23 जानेवारीला एकदिवसीय मालिकेतील 3 सामने खेळवले जातील.
4 / 10
इंग्लंडचा ऑस्ट्रेलिया दौरा (अॅशेस) : इंग्लंडचा संघ 5 कसोटी सामन्यांची अॅशेस मालिका खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आहे. या मालिकेतील पहिले 3 सामने डिसेंबर 2021 मध्ये खेळवण्यात आले आहेत. आणि, उर्वरित दोन सामने जानेवारी 2022 मध्ये होतील. अॅशेसमालिकेतील चौथा कसोटी सामना 5 ते 9 जानेवारी दरम्यान सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर तर पाचवा आणि शेवटचा कसोटी सामना 14 ते 18 जानेवारी दरम्यान होबार्ट येथे खेळवला जाईल.
5 / 10
आयर्लंडचा वेस्ट इंडिज दौरा : जानेवारी 2022 मध्ये, आयर्लंडचा संघ 3 वनडे आणि 1 टी-20 सामन्यांची मालिका खेळण्यासाठी वेस्ट इंडिज दौऱ्यावर असेल. 8, 11 आणि 14 जानेवारीला जमैकामध्ये एकदिवसीय सामने खेळवले जातील. तर 16 जानेवारीला जमैकामध्ये एकमेव टी-20 सामना खेळवला जाणार आहे.
6 / 10
न्यूझीलंडचा ऑस्ट्रेलिया दौरा: जानेवारीच्या अखेरीपासून ते फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत न्यूझीलंडचा संघ चॅपल-हेडली ट्रॉफीमध्ये सहभागी होण्याच्या इराद्याने ऑस्ट्रेलियात असेल. या दौऱ्यात 3 एकदिवसीय आणि 3 टी-20 सामने खेळवले जातील.
7 / 10
इंग्लंडचा वेस्ट इंडिज दौरा : इंग्लंडचा संघ 5 टी-20 सामन्यांची मालिका खेळण्याच्या इराद्याने वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर जाणार आहे. या मालिकेची सुरुवात T20 मालिकेने होईल, यातला पहिला T20 सामना 22 जानेवारीपासून दोन्ही संघांमध्ये होणार आहे. याशिवाय उर्वरित 4 सामने 23, 26, 29 आणि 30 जानेवारीला होणार आहेत.
8 / 10
पाकिस्तान सुपर लीग : आयपीएल सुरू होण्यास अद्याप वेळ आहे. परंतु 27 जानेवारी 2022 पासून, पाकिस्तान सुपर लीगचा पुढचा हंगाम म्हणजेच पीएसएल सुरू होणार आहे. 27 ते 31 जानेवारी दरम्यान त्याचे 7 सामने होणार आहेत.
9 / 10
बिग बॅश आणि सुपर स्मॅश: ऑस्ट्रेलियाच्या T20 लीग बिग बॅशचा थरार डिसेंबर 2021 पासून सुरू आहे. जानेवारी 2022 मध्येही हा थरार कायम राहणार आहे. बिग बॅशचा अंतिम सामना 28 जानेवारी 2022 रोजी होणार आहे. दुसरीकडे, नोव्हेंबर 2021 पासून सुरू असलेल्या न्यूझीलंडच्या T20 लीग सुपर स्मॅशचा अंतिम सामना 29 जानेवारी रोजी खेळवला जाईल.
10 / 10
महिला क्रिकेटचे सामने: इंग्लंडचा महिला क्रिकेट संघ जानेवारी 2022 मध्ये एकमेव कसोटी सामना खेळण्याच्या इराद्याने ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. ही कसोटी 27 ते 30 जानेवारी दरम्यान खेळवली जाईल. यानंतर वेस्ट इंडिजचा महिला संघ 3 टी-20 आणि 5 एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळण्याच्या इराद्याने दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. 18, 20 आणि 22 जानेवारीला टी-20 मालिकेचे सामने होणार आहेत. तर वनडे मालिकेतील पहिले 3 सामने 25, 28 आणि 31 जानेवारीला होणार आहेत.