मुंबई – BCCI यावर्षीपासून सुरु होणाऱ्या महिला IPL च्या तयारीमध्ये व्यस्त आहे. या महिन्यात मीडिया राइट्सच ऑक्शन झालं. काही दिवसांपूर्वी लीगमध्ये सहभागी होणाऱ्या टीम्सची घोषणा करण्यात आली. आता महिला प्रीमियर लीगमधील खेळाडूंच्या ऑक्शनची प्रतिक्षा आहे. पहिल्यांदाच भारतात महिला खेळाडूंसाठी ऑक्शन होणार आहे. मागच्या काही वर्षांपासून देशात महिला आयपीएल सुरु करण्याची मागणी होत होती. मागच्यावर्षी बीसीसीआयचे तत्कालिन अध्यक्ष सौरव गांगुली यांनी 2023 मध्ये महिला आयपीएल सुरु होणार असल्याची घोषणा केली. आता टीम्स निश्चित झाल्या आहेत. कुठली सुपरस्टार कुठल्या टीममधून खेळणार त्यावर आता नजर असेल.
‘या’ महिन्यात होणार ऑक्शन
बीसीसीआयने महिला आयपीएलमध्ये खेळणाऱ्या खेळाडूंच्या ऑक्शनच्या तारखेची अजून अधिकृत घोषणा केलेली नाही. न्यूज 18 च्या वृत्तानुसार, हे ऑक्शन पुढच्या महिन्यात होईल. देशाची राजधानी दिल्लीत 10 किंवा 11 फेब्रुवारीला ऑक्शन होईल. ऑक्शन लिस्टमध्ये भारताच्या स्टार खेळाडूंशिवाय काही परदेशी खेळाडू सुद्धा आहेत. या सगळ्या खेळाडूंच्या नशिबाचा फैसला ऑक्शनमध्ये होईल.
पाच टीम्ससाठी 4669.99 कोटींची बोली
ऑक्शनमध्ये एकूण पाच फ्रेंचायजी सहभागी होणार आहेत. काही दिवसांपूर्वी झालेल्या ऑक्शनमध्ये फ्रेंचायजी आणि टीम्सची शहर निश्चित झाली होती. बीसीसीआय सचिन जय शाह यांनी, पाच टीम्ससाठी 4669.99 कोटीची बोली लावल्याची माहिती टि्वट करुन दिली होती. अदानी स्पोर्ट्स लाइन प्रायव्हे लिमिटेडने अहमदाबादच्या टीमसाठी 1289 कोटी रुपयांची बोली लावली.लीगमधील हा सर्वात महागडा संघ आहे. मुंबईच्या टीमसाठी रिलायन्सची कंपनी इंडिया विन स्पोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेडने 912.99 कोटी रुपये खर्च केले.
कोणी किती कोटीला विकत घेतली टीम?
बँगलोर रॉयल चॅलेंजर्स स्पोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेडने महिला प्रीमियर लीगमध्ये बँगलोरची टीम विकत घेतली. त्यासाठी त्यांनी 901 कोटी रुपयांची बोली लावली. जेएसडब्ल्यू जीएमआर क्रिकेट प्राइवेट लिमिटेडने 810 कोटी रुपयांमध्ये दिल्लीची टीम विकत घेतली. केपरी ग्लोबल होल्डिंग्सजवळ लखनौच्या महिला टीमचे मालकी हक्क असतील. त्यासाठी त्यांनी 757 कोटी रुपये मोजले.