WPL 2023 Points Table : महिला प्रीमियर लीगमधील प्रत्येक सामन्यानंतर, या सीजनमध्ये कुठली टीम मजबूत आहे, ते स्पष्ट होत चाललय. मुंबईमध्ये WPL 2023 लीगचे आतापर्यंत सात सामने झाले आहेत. यात एका टीमचा दबदबा कायम आहे. त्या टीमच नाव आहे, मुंबई इंडियन्स. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सची टीम शानदार प्रदर्शन करतेय. आपल्या तिसऱ्या मॅचमध्ये मुंबई इंडियन्सने गुरुवारी 9 मार्चला दिल्ली कॅपिटल्सवर 8 विकेट राखून सहज विजय मिळवला. या विजयाबरोबरच मुंबई इंडियन्सच पॉइंट्स टेबलमधील स्थान अधिक भक्कम झालय.
WPL 2023 मध्ये आतापर्यंत 7 सामने झालेत. फक्त यूपी वॉरियर्झ सोडून बाकी चार टीम्सनी प्रत्येकी 3-3 सामने खेळलेत. नवी मुंबईच्या डी.वाय.पाटील स्टेडियमवर गुरुवारी संध्याकाळी मुंबई आणि दिल्लीने आपला तिसरा सामना खेळला. या दोन्ही टीम्सनी आपले पहिले दोन्ही सामने जिंकले होते. दोन्ही अजिंक्य असलेल्या टीम्समध्ये एका टीमचा पराभव निश्चित होता. हा पराभव दिल्लीच्या वाट्याला आला. त्यांनी फक्त 105 धावा केल्या. मुंबई इंडियन्सने फक्त 2 विकेट गमावून हे लक्ष्य आरामात पार केलं.
दिल्लीने संधी वाया घालवली
मुंबई आणि दिल्लीच्या सामन्याने पॉइंट्स टेबलच्या पहिल्या दोन स्थानांवर परिणाम होणार होता. पण असं झालं नाही. या मॅचआधी मुंबई पहिल्या आणि दिल्ली दुसऱ्या स्थानावर होती. दोन्ही टीम्सचे 4-4 पॉइंट्स होते. पण चांगल्या नेट रनरेटमुळे मुंबईची टीम पहिल्या स्थानावर होती. अशावेळी कालच्या मॅचमध्ये दिल्लीकडे पहिलं स्थान मिळवण्याची संधी होती. पण त्यात ते कमी पडले.
टीम | सामने | विजय | पराजय | नेट रनरेट | पॉइंट्स |
---|---|---|---|---|---|
मुंबई इंडियन्स | 3 | 3 | 0 | +4.228 | 6 |
दिल्ली कॅपिटल्स | 3 | 2 | 1 | +0.965 | 4 |
यूपी वॉरियर्स | 2 | 1 | 1 | -0.864 | 2 |
गुजरात जायंट्स | 3 | 1 | 2 | -2.327 | 2 |
रॉयल चॅलेंजर्स बँगलोर | 3 | 0 | 3 | -2.263 | 0 |
RCB आणि DC कडे संधी
लीगच्या बाकी दोन टीम्सच्या स्थानामध्ये कोणताही बदल झालेला नाही. यूपी तिसऱ्या, गुजरात चौथ्या आणि बँगलोरची टीम पाचव्या स्थानावर आहे. RCB कडे आपली स्थिती सुधारण्याची संधी आहे. शुक्रवारी 10 मार्चला बँगलोरचा चौथा सामना यूपी विरुद्ध होणार आहे.
बँगलोरने पराभवाची हॅट्ट्रिक केली आहे. यूपीने 2 पैकी एक मॅच जिंकली आहे. बँगलोरने ही मॅच जिंकली, तर 2 पॉइंट्सससह ते चौथ्या स्थानावर पोहोचतील. त्यांचा NRR गुजरातपेक्षा चांगला आहे. यूपीने मॅच जिंकली, तर दिल्लीकडून ते दुसरं स्थान हिसकावू शकतात.