चंदीगड: सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर जेव्हापासून क्रिकेटच्या मैदानात उतरलाय, क्रिकेट रसिकांची नजर त्याच्यावर आहे. अर्जुन आपल्या वडिलांप्रमाणेच क्रिकेट खेळणार का? यावर सगळ्यांच लक्ष आहे. अर्जुनने गोव्याकडून खेळताना या सीजनमध्ये रणजी डेब्यु केला. वडिलांप्रमाणेच अर्जुनने सुद्धा डेब्यु मॅचमध्ये शतक झळकावलं. अर्जुन पहिल्यांदा आपल्या बॅटिंगमुळे चर्चेत आलाय. याचं सर्वाधिक श्रेय जातं, माजी क्रिकेटर योगराज सिंग यांना. ते सध्या अर्जुनचे कोच आहेत.
योगराज काय म्हणाले?
योगराज सिंग त्यांच्या कठोर स्वभावासाठी ओळखले जातात. कोच म्हणून ते किती कठोर आहेत, हे त्यांचा मुलगा युवराज सिंगला चांगलं ठाऊक आहे. युवराज आपल्या वडिलांना ड्रॅग्न सिंग म्हणतो. योगराज यांची ट्रेनिंग आणि त्यांचा कठोरपणा यानेच युवराजला एक चांगला वर्ल्ड क्लास क्रिकेटर बनवलं. आता अर्जुनकडूनही अशाच अपेक्षा आहेत. योगराज कठोरतेसाठी ओळखले जातात. कदाचित हीच एक गोष्ट सचिनला कधी जमली नाही. टीव्ही 9 शी बोलताना योगराज सिंग म्हणाले की, “अर्जुनमध्ये भरपूर प्रतिभा आहे. पण त्याच्याबरोबर कधी कठोर व्यवहार झाला नाही. त्यामुळे तो आपलं बेस्ट देऊ शकलेला नाही”
‘लहान मुलगा आहे, सोडून द्या’
योगराज सिंग यांनी रणजी ट्रॉफी स्पर्धेआधी अर्जुनला 15 दिवस ट्रेनिंग दिली. “अर्जुन ऐकत नाही, असं लोकांकडून मला समजलं. लोकांनी मला सांगितलं अर्जुन ऐकत नाही, मी म्हटलं तुम्ही कमजोर आहात, म्हणून तो तुमचं ऐकत नाही. त्याला मी कठोरता दाखवली नाही. पण त्याला माझं ऐकाव लागलं. माझ्यासोबत ट्रेनिंग करण्यासाठी त्याला तेच करावं लागेल, जे मला हवं. लहान मुलगा आहे, सोडून द्या, असं मला लोकांनी सांगितलं, पण मी असा नाहीय” असं योगराज म्हणाले.
अर्जुनमध्ये दिसतो नातू
योगराज सिंग यांना अर्जुनने खूप प्रभावित केलय. त्यांच्यामते अर्जुनमध्ये खूप प्रतिभा आहे. तो चांगला खेळाडू बनेल. कोणी कधी अर्जुनच्या बॅटिंगकडे लक्ष दिलं नाही. तो चांगली बॅटिंग करतो. त्याला ओपनिंगला पाठवलं पाहिजे, असं मी त्याच्या कोचला सांगितलं. एकदिवस तो नक्कीच महान खेळाडू बनेल असं योगराज सिंग म्हणाले. “मला युवराज आणि सचिनने जबाबदारी दिलीय. मला त्याच्यामध्ये माझा नातू दिसतो. मी त्याचा पाठलाग सोडणार नाही” असं योगराज म्हणाले.