चंदीगड : आयपीएलमध्ये अर्जुन तेंडुलकरने केकेआर विरुद्ध सामना खेळून आपला डेब्यु केला. सचिनचा मुलगा असलेल्या अर्जुनने आयपीएलमध्ये आतापर्यंत 4 सामन्यात 3 विकेट घेतलेत. फलंदाजी करताना फक्त 13 धावा केल्यात. गुजरात टायटन्स विरुद्धच्या सामन्यात अर्जुन तेंडुलकरला बॅटिंग करण्याची संधी मिळाली. त्या मॅचमध्ये अर्जुनने 9 चेंडूत 13 धावा केल्या. यात एक सिक्सही होता.
अर्जुनला आतापर्यंत आयपीएलच्या एका सामन्यात फलंदाजीची संधी मिळालीय. अर्जुनला जास्तीत जास्त सामन्यात बॅटिंग द्या, अशी फॅन्सची मागणी आहे. आता प्रसिद्ध क्रिकेटपटू युवराज सिंग याचे पिता योगराज सिंग यांनी मुंबई इंडियन्सच्या टीम मॅनेजमेंटकडे मागणी केली आहे. अर्जुनला जास्तीत जास्त फलंदाजीची संधी द्या असं त्यांनी अपील केलय.
योगराज यांची हात जोडून विनंती
CINE PUNJABI यू-ट्यूब चॅनलवर योगराज यांनी अर्जुनच्या फलंदाजीबद्दल भाष्य केलं. त्यांनी मुंबई इंडियन्सच्या टीम मॅनेजमेंटकडे अपील केलय. “मी हात जोडून अपील करतो, अर्जुनला 3 नंबरवर फलंदाजीची संधी द्या. एक मुलगा इथे आला. माझ्याकडे 12 दिवस राहिला. तो कसा फलंदाज आहे, हे तुम्हाला समजलं पाहिजे, तो कसा फलंदाज आहे. माझ्या स्टुडंटमध्ये काय खास आहे? हे कोचला समजलं पाहिजे. जी क्षमता त्याच्यात आहे, त्याला संधी दिली पाहिजे” असं योगराज म्हणाले.
‘मी लिहून देतो, की….’
“मी हे पुन्हा एकदा बोलतो, ज्या दिवशी अर्जुन तेंडुलकर टी 20 मध्ये बॅटिंग करेल, त्या दिवशी तो नंबर 3 किंवा ओपनिंगला येईल. मी लिहून देतो, जग त्याला लक्षात ठेवेल, असा फलंदाज तो बनेल. तो फलंदाज आणि गोलंदाज आहे. मॅनेजमेंटने त्याला बॅटिंगची संधी द्यावी. त्याला नंबर 3 वर खेळण्याची एक संधी मिळाली पाहिजे” असं योगराज सिंह म्हणाले.
रणजी ट्रॉफीच्या डेब्यु मॅचमध्ये अर्जुनने बॅटिंग करताना शतक ठोकलं होतं. त्याआधी तो चंदीगडला गेला होता. तिथे त्याने योगराज सिंग यांच्या अंडर ट्रेनिंग केलय.