T20 World Cup 2021: भारतीय संघाने विश्वचषकाची (T20 World Cup 2021) सुरुवात अतिशय खराब केली आहे. पाकिस्तानने 10 विकेट्सनी मात दिल्यामुळे आता भारतीय संघाला उर्वरीत सामने मोठ्या फरकाने जिंकणे गरजेचे आहे. त्यात पुढील सामना रविवारी (31 ऑक्टोबर) न्यूझीलंड संघासोबत असणार आहे. दरम्यान या सामन्यापूर्वीच भारताचा माजी दिग्गज गोलंदाज झहीर खानने भारतीय संघाला एक मोलाचा सल्ला दिला आहे. त्याने न्यूझीलंड संघाच्या जिंकण्याच्या वृत्तीपासून भारतीय संघाला सावध राहण्यास सांगितलं आहे.
झहीर खान म्हणाला, ”न्यूझीलंडचा संघ प्रत्येक सामना जिंकण्यासाठी अत्यंत जोशात खेळतो. पाकिस्तानविरुद्धही अतिशय खराब फलंदाजीनंतर 135 धावांचे छोटे आव्हानही त्यांनी पूर्ण करताना पाकिस्तानला अवघड केले. बोलिंग आणि फिल्डिंगमध्ये जी कामगिरी केली ती पाहिली तर त्यांनी अखेरपर्यंत मॅच सोडली नव्हती, त्यामुळे भारतानेही सावध राहणं गरजेचं आहे.’
ग्रुप 2 मध्ये असणाऱ्या भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघाना पाकिस्तानने पहिल्या सामन्यात पराभूत केलं आहे. त्यामुळे आता आगामी सामन्यात विजय मिळवण्यासाठी दोन्ही संघ जीवाचं रान कऱणार हे नक्की. स्पर्धेत टिकून राहण्यासाठी हा विजय दोन्ही संघासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. सध्या पाकिस्तान पहिल्या स्थानी तर अफगाणिस्तान दुसऱ्या स्थानी असून भारत आणि न्यूझीलंड हे संघ विजयी आणि चांगल्या रनरेटने गुणतालिकेत पुढे जाण्यासाठी प्रयत्न करणार आहेत.
भारत आणि न्यूझीलंड हा सामना रविवारी अर्थात 31 ऑक्टोबर रोजी दुबईच्या आंतरराष्ट्रीय मैदानावर खेळवला जाणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार हा सामना सायंकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरु होईल. तर 7 वाजता नाणेफेक होणार आहे.
सुपर 12 चे दोन ग्रुप असून ग्रुप 2 मध्ये भारत, पाकिस्तान, न्यूझीलंड, अफगाणिस्तान, स्कॉटलंड आणि नामिबीया हे संघ आहेत. यामध्ये पाकने भारत आणि न्यूझीलंड या दोघांना मात देत अव्वल स्थान गाठलं आहे. त्यांच्या खात्यात 4 गुण आहेत. तर अफगाणिस्तानने स्कॉटलंडला मात दिल्यामुळे ते 2 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहेत. नामिबीया संघाने स्कॉटलंडला मात देत तिसरं स्थान गाठलं आहे. तर न्यूझीलंड, भारत हे संघ एक-एक पराभव स्वीकारुन चौथ्या, पाचव्या स्थानावर आहेत. तर स्कॉटलंडचा संघ दोन पराभवांसह सहाव्या स्थानावर आहे.
हे ही वाचा
India vs New zealand: खुशखबर! हार्दीकने सुरु केली गोलंदाजी, न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यासाठी सज्ज
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेपूर्वीच मुंबई संघावर संकट, संघातील 4 खेळाडू कोरोनाबाधित
(Zaheer Khan says new zealands winning attitude is dangerous for team india in india vs new zealand match)