‘धोनीने ठोकलेला षटकार जिथे पडला, ते वानखेडेतील आसन राखीव ठेवा’, MCA कडे विश्वस्तांची मागणी

| Updated on: Aug 18, 2020 | 1:01 PM

धोनीच्या नावाने वानखेडे स्टेडियममध्ये कायमस्वरुपी आसन राखीव ठेवण्याची मागणी झाली आहे (Permanent seat to MS Dhoni in Wankhede stadium).

धोनीने ठोकलेला षटकार जिथे पडला, ते वानखेडेतील आसन राखीव ठेवा, MCA कडे विश्वस्तांची मागणी
Follow us on

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या भारतीय क्रिकेटमधील योगदानासाठी त्यांचा सन्मान म्हणून त्याच्या नावाने वानखेडे स्टेडियममध्ये कायमस्वरुपी आसन राखीव ठेवण्याची मागणी झाली आहे (Permanent seat to MS Dhoni in Wankhede stadium). मुंबई क्रिकेट असोसिएशनचे विश्वस्त अजिंक्य नाईक यांनी ही मागणी केली आहे. याबाबत त्यांनी मुंबई असोसिएशनला त्याबाबत पत्रही लिहिलं आहे. आज (18 ऑगस्ट) एमसीएची बैठक होत आहे. याच पार्श्वभूमीवर हे पत्र देण्यात आलं आहे.

अजिंक्य नाईक यांच्या मागणीवर एमसीएच्या आजच्या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. नाईक यांनी महेंद्रसिंह धोनीच्या ऐतिहासिक क्रिकेट कामगिरीचा सन्मान म्हणून आणि अभिवादन करण्यासाठी एमसीएला अनेक सूचना केल्या आहेत. यात त्यांनी विश्वचषक 2011 च्या अंतिम सामन्यात शेवटच्या क्षणी धोनीने मारलेला षटकार प्रेक्षक गॅलरीत ज्या आसनावर जाऊन पडला ते आसन राखीव ठेवण्याची मागणी केली आहे. तसेच त्या आसनाचे खास सुशोभीकरण करण्याची सूचना केली आहे.

हेही वाचा : वय वाढलं, पण फिटनेसबद्दल बोलण्याची कोणाचीही हिम्मत नव्हती, धोनीच्या निवृत्तीची कारणे कोणती?

मुंबई क्रिकेट असोसिएशनचे विश्वस्त अजिंक्य नाईक म्हणाले, “भारतीय क्रिकेट विश्वाला महेंद्रसिंह धोनीने दिलेल्या योगदानासाठी त्याचा सन्मान म्हणून आणि त्याला अभिवादन करण्यासाठी मी काही सूचना करत आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशन 2011 च्या विश्वकप अंतिम सामन्यात धोनीचा चषकविजेता षटकार ज्या आसनावर पडला ते बाकडं कायमस्वरुपी धोनीच्या नावाने समर्पित करु शकते. आपण धोनीने विश्वचषकाला गवसणी घालण्यासाठी ठोकलेला शेवटचा षटकार नेमका कोणत्या आसनावर पडला होता हे शोधू शकतो.”

“भारतीय क्रिकेटच्या इतिहासात महेंद्रसिंह धोनीचं ऐतिहासिक वानखेडे स्टेडिअमशी असलेलं नातं उत्साहात साजरं करण्यासाठी आपण ते आसन रंगवून त्याचं सुशोभीकरण करु शकतो. हे आसन पर्यटकांसाठी आकर्षणाचं केंद्रही बनवता येईल. स्टेडिअम पाहायला येणारे पर्यटक येथे भेट देऊ शकतील. यामुळे पर्यटकांना भारतीय क्रिकेटचा दैदिप्यमान क्षण आठवेल आणि हाच एमसीएचा ठेवा असेल,” असं अजिंक्य नाईक यांनी सांगितलं.

“याशिवाय धोनीने ज्या चेंडूवर विश्वचषकातील षटकार ठोकला तो चेंडू शोधला तर तो आगामी काळातील क्रिकेट संग्रहालयात अभिमानाचं केंद्र ठरेल. क्रिकेट विश्वातील दैदिप्यमान खेळाडू असलेल्या धोनीच्या सन्मानासाठी मी या छोट्याशा सुचना करत आहे,” असंही त्यांनी नमूद केलं.

संबंधित बातम्या:

MS Dhoni Retirement | महेंद्रसिंह धोनीचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा, आयपीएलमध्ये खेळणार

युवराजचा बोलर म्हणून वापर, ते सलामीसाठी रोहितची निवड, धोनीचे 10 बेमिसाल निर्णय

जगाने क्रिकेट विश्वातील तुझे विक्रम पाहिले, मी माणूस पाहिला, धोनीच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर विराट भावूक

संबंधित व्हिडीओ :


Permanent seat to MS Dhoni in Wankhede stadium