दोहा: फुटबॉल विश्वाला नवीन चॅम्पियन मिळाला आहे. पेनल्टी शूटआऊटमध्ये अर्जेंटिनाने फ्रान्सवर 4-2 असा विजय मिळवला. या विजयासह दिग्गज फुटबॉलपटू लियोनल मेस्सीच वर्ल्ड कप जिंकण्याच स्वप्न साकार झालं. संपूर्ण वर्ल्ड कप दरम्यान लियोनल मेस्सीची चर्चा होती. फायनलमध्येही त्याने लौकीकाला साजेसा खेळ दाखवला. त्याने एकूण 3 गोल केले. जगभरातील कोट्यवधी फुटबॉल प्रेमींची या फायनल मॅचवर नजर होती. त्याचवेळी Nike आणि Adidas या कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करणाऱ्यांच्या नजरासुद्धा फायनल मॅचवर होत्या. अर्जेंटिनाच्या फुटबॉल टीमला Adidas तर फ्रान्सच्या टीमला Nike स्पॉन्सर करते.
कोणाचे शेअर्स वाढले? कोणाचे घसरले?
फिफा फुटबॉल वर्ल्ड कप 2022 फायनल रिझल्टचा परिणाम Nike आणि Adidas च्या शेअर्सवर दिसून येतोय. अर्जेंटिनाची टीम Adidas ची जर्सी घालून मैदानात उतरली होती. त्यानंतर Adidas शेअर्सच्या किमतीमध्ये वाढ दिसून आली. कंपनीचा शेअर 1.93 टक्क्यांनी वाढून 121.30 युरो (फ्रँकफर्ट स्टॉक एक्सचेंज) वर क्लोज झाला. दुसऱ्याबाजूला फ्रान्स टीमची स्पॉन्सर असलेल्या Nike च्या शेअर्समध्ये घसरण झाली.
वर्ल्ड कपपासून Adidas च्या शेअर्समध्ये किती टक्के वाढ?
यावर्षीचे आकडे पाहिले, तर Adidas च्या शेअर्समध्ये 53.26 टक्के घसरण पहायला मिळाली आहे. पण वर्ल्ड कप सुरु होण्याआधी Adidas शेअर्समध्ये वाढ दिसून आली होती. 3 नोव्हेंबरपासून आतापर्यंत कंपनीच्या शेअर्समध्ये 28 टक्के वाढ झालीय.
कुठल्या जर्सीला सर्वाधिक मागणी?
फ्रान्स विरुद्ध वर्ल्ड कप फायनलआधी Adidas ने अर्जेंटिनाची स्ट्रिप्स असलेल्या जर्सीची संपूर्ण जगभरात मोठ्या प्रमाणात विक्री केली. लियोनल मेस्सीचा फोटो असलेल्या जर्सीला जगभरात मोठी मागणी होती. कंपनीचा सेल वाढला. त्याचा परिणाम वर्ल्ड कप दरम्यान कंपनीच्या शेअर्सवर दिसून आला.