मुंबई: क्रोएशियाच्या मारिन सिलिचने (Marin Cilic) फ्रेंच ओपन स्पर्धेच्या (French open 2022) उपांत्यफेरीत प्रवेश केला आहे. क्वार्टर फायनलच्या रोमांचक सामन्यात त्याने रशियाच्या आंद्रे रुबलेवला (Andrey Rublev) पराभूत केलं. टेनिस चाहत्यांना या सामन्याच्या निमित्ताने एक दर्जेदार खेळ पहायला मिळाला. पाच सेटपर्यंत हा सामना रंगला होता. सिलिच पेक्षा रुबलेवचे वरचे रँकिंग आहे. त्याने सामन्याची सुरुवातही तशीच केली. रुबलेवने पहिला सेट जिंकला. पण मारिन सिलिचने हार मानली नाही. त्याने दुसऱ्या सेटमध्ये जोरदार कमबॅक केलं व सेट जिंकला. त्याने दुसरा आणि तिसरा असे लागोपाठ दोन सेट जिंकले. त्यानंतर रुबलेवने चौथा सेट जिंकला. त्यामुळे सामन्यात रंगत अधिकच वाढली. पाचव्या सेटमध्ये सिलिच आणि रुबलेव दोघांनी तोडीस तोड खेळ केला. त्यामुळे टाय-ब्रेकरमध्ये सामना खेचला गेला.
टाय-ब्रेकरमध्ये रुबलेवने सामन्याची लय गमावलीय असं वाटलं. त्याचवेळी सिलिच एक-एक पॉइंट घेत होता. रुबलेवच्या तुलनेत सिलिचने पॉइंट मिळवून देणारे स्मॅशचे फटके उत्तम खेळले. अखेर सिलिचने 5-7, 6-3, 6-4, 3-6, 7-6 (10/2) असा सामना जिंकला. सिलिचचा उपांत्यफेरीत सामना कॅस्पर रुद आणि हॉल्गर रुईन यांच्यातील विजेत्याशी होणार आहे. दुसऱ्या सेमीफायनल सामन्यात अव्वल टेनिसपटू राफेल नादाल वर्ल्ड नंबर 3 अलेक्झांडर बरोबर खेळणार आहे.
राफेल नादाल हा लाल मातीच्या कोर्टवरचा अव्वल टेनिसपटू आहे. त्याला लाल मातीचा बादशाह समजलं जातं. आतापर्यंत त्याने फ्रेंच ओपनची 13 जेतेपद पटकावली आहेत. काल क्वार्टर फायनलच्या मॅचमध्ये त्याने नोव्हाक जोकोविच सारख्या अव्वल टेनिसपटूला पराभूत केलं होतं. महिला एकेरीत वर्ल्ड नंबर 1 इगा स्विटेक आणि दारीया कासातिना यांच्यामध्ये लढत होणार आहे.
क्वार्टर फायनलच्या दुसऱ्या सामन्यात नॉर्वेच्या कॅस्पर रुदने डेन्मार्कच्या हॉल्गर रुईनचा पराभव केला. कॅस्पर रुदने पहिल्यांदाच ग्रँड स्लॅम स्पर्धेच्या उपांत्यफेरीत प्रवेश केला आहे. हा सामना चार सेटपर्यंत चालला. सेमीफायनलमध्ये कॅस्परची लढत क्रोएशियाच्या मारिन सिलिच बरोबर होणार आहे. त्याने रशियाच्या आंद्रे रुबलेवला पराभूत केलं. कॅस्पर रुदने हॉल्गर रुईनवर 6-1, 4-6, 7-6(2), 6-3 असा विजय मिळवला.