मुंबई: सध्या फ्रेंच ओपन स्पर्धा (French Open) सुरु आहे. भारताची अव्वल महिला टेनिसपटू सानिया मिर्झा आणि तिची झेक जोडीदार लुसी हर्डेकाला (Sanil Mirza-lucie hradecka) महिला दुहेरीच्या तिसऱ्या फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. अमेरिकेची कोको गॉफ आणि जेसिका पीगुलाने (coco Gauff-jessica pegula) 4-6, 3-6 असा सरळ सेटमध्ये मिर्झा-ल्युसी जोडीचा पराभव केला. सानिया मिर्झा-लुसी हर्डेका जोडीचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे. कोको गॉफ-जेसिका पीगुला जोडीने सुरुवातीपासून सानिया मिर्झा-लुसी हर्डेका जोडीवर वर्चस्व गाजवलं. अखेरीस सामना देखील त्यांनी जिंकला. पहिल्या सेटमध्ये अमेरिकन जोडीने 3-0 अशी आघाडी घेतली होती. त्यानंतर सानिया-हर्डेका जोडीने पुनरागमन केलं. त्यांचा स्कोर 5-4 होता. पण शेवटी पहिला सेट त्यांनी 6-5 असा गमावला. दुसऱ्या सेटमध्ये सानिया-हर्डेका जोडीने चांगली सुरुवात केली.
सानिया-हर्डेका या 10 व्या सीडेड जोडीने 2-0 अशी आघाडी घेतली होती. त्यानंतर अमेरिकन कोको गॉफ-जेसिका पीगुला जोडीने पुनरागमन केलं. त्यांनी 2-2 अशी बरोबरी साधली. एकवेळ स्कोर 3-3 असा होता. पण शेवटी कोको गुआफ-जेसिका पीगुला जोडीने 6-5 ने सेटसह सामना जिंकला.
दुसऱ्या एका मोठ्या सामन्यात 13 वेळचा फ्रेंच ओपन चॅम्पियन राफेल नदालने उपांत्यपूर्व फेरीत गतविजेत्या नोव्हाक जोकोविचवर रोमहर्षक विजय मिळवला. नदालने आपल्या विक्रमी 14 व्या रोलँड गॅरोस विजेतेपदाकडे वाटचाल केली. नादालने जोकोव्हिचवर 6-2, 4-6, 6-2, 7-6 (7-4) वर विजय मिळवला. आता शुक्रवारी उपांत्य फेरीत त्याचा सामना जर्मनीच्या अलेक्झांडर झ्वेरेव्हशी होणार आहे.