न्यूझीलंडकडून कसोटी मालिकेत 0-3 असा लाजिरवाणा पराभव झाला. हा पराभव प्रचंड जिव्हारी लागला आहे. BCCI कडून या पराभवाची गंभीर दखल घेतली जाईल, असे संकेत मिळत आहेत. टीमच्या खेळाडूंसोबतच हेड कोच गौतम गंभीर आणि संपूर्ण मॅनेजमेंटवर प्रश्नचिन्ह निर्माण झालय. भारतीय टीम आता बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी ऑस्ट्रेलियाला रवाना होणार आहे. या दरम्यान आता एक मोठी बातमी समोर आलीय. दैनिक जागरणच्या रिपोर्ट्नुसार ऑस्ट्रेलिया दौरा गौतम गंभीरसाठी स्वत:ला सिद्ध करण्याची शेवटची संधी आहे. भारतीय टीमने चांगलं प्रदर्शन केलं नाही, तर बीसीसीआय गंभीर विरोधात कठोर पावलं उचलू शकते.
टी20 वर्ल्ड कप विजयानंतर राहुल द्रविडचा कार्यकाळ समाप्त झाला. त्यानंतर आयपीएलमधील प्रदर्शन लक्षात घेऊन बीसीसीआयने गौतम गंभीरला बीसीसीआयच्या हेडकोच पदावर नियुक्त केलं. पण गंभीरने सूत्र स्वीकारल्यापासून टीम इंडियातली स्थिती बिघडली आहे. श्रीलंकेत वनडे सीरीज गमावली. त्यानंतर टीम इंडियाला घरच्या मैदानात कसोटी मालिकेत पराभव स्वीकारावा लागला. बीसीसीआय आता दोन्ही फॉर्मेटमध्ये वेगवेगळे कोच नियुक्त करण्याचा विचार करत आहे.
…मग, कोणाकडे देणार जबाबदारी?
BCCI सूत्रांच्या हवाल्याने दैनिक जागरणने दिलेल्या रिपोर्ट्नुसार बोर्ड आपला निर्णय बदलून गंभीरला हटवणार नाही. पण रेड आणि व्हाइट बॉल फॉर्मेटमध्ये वेगवेगळ्या कोचची नियुक्ती केली जाऊ शकते. हा निर्णय भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर अवलंबून आहे. ऑस्ट्रेलियात टेस्ट सीरीजमध्ये टीम इंडियाचा दारुण पराभव झाल्यास गंभीरकडून कसोटीची सूत्र काढून घेतली जातील. त्याजागी NCA चे हेड वीवीएस लक्ष्मण यांची नियुक्ती होऊ शकते. वनडे आणि T20 मध्ये गंभीरच हेड कोच असेल. लक्ष्मण सध्या भारताच्या T20 टीमसोबत दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर गेले आहेत. याआधी सुद्धा ते T20 टीमसोबत झिम्बाब्वे दौऱ्यावर गेले होते.
BCCI ने मीटिंगमध्ये काय विचारलं?
मुंबई टेस्टमध्ये भारतीय टीमचा अवघ्या तीन दिवसात पराभव झाला. त्यासोबतच मालिका 0-3 ने गमावली. या लाजिरवाण्यापराभवानंतर बीसीसीआयने कॅप्टन रोहित शर्मा, हेड कोच गौतम गंभीर आणि चीफ सिलेक्टर अजित आगरकर यांच्यासोबत मीटिंग केली. यावेळी रँक टर्नर पीचची मागणी आणि जसप्रीत बुमराहला शेवटच्या टेस्टसाठी विश्रांती देण्याच्या निर्णयावर प्रश्न विचारण्यात आले. रोहित शर्मासोबत गौतम गंभीरची कोचिंग आणि टीम सिलेक्शनबद्दल चर्चा झाली. पीटीआयच्या रिपोर्ट्नुसार या मीटिंगनंतर टीम मॅनेजमेंटचे काही सदस्य आणि हेड कोच गौतम गंभीर यांच्यात सिलेक्शनवरुन काही मतभेद असल्याच समोर आलं. तिघांना बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या प्लानिंगबद्दल विचारण्यात आलं.