ऑस्ट्रेलियात टीम इंडियाने खराब प्रदर्शन केलय. पाच कसोटी सामन्यांच्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये ऑस्ट्रेलियाने 2-1 अशी आघाडी घेतली आहे. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा, स्टार फलंदाज विराट कोहलीसह काही खेळाडूंच्या प्रदर्शनावर प्रश्नचिन्ह निर्माण झालय. त्यांच्या कामगिरीवर टीका सुरु आहे. फक्त खेळाडूच नाही, टीम इंडियाचे हेड कोच गौतम गंभीर सुद्धा या प्रदर्शनानंतर अनेकांच्या रडारवर आहेत. आता सगळ्या नजरा शेवटच्या सिडनी टेस्ट मॅचवर आहेत. टीम इंडियाकडे मालिका बरोबरीत सोडवण्याची संधी आहे. दरम्यान गौतम गंभीरबद्दल एक धक्कादायक खुलासा झाला आहे, त्यात त्याला नाईलाजाने टीम इंडियाचा हेड कोच बनवल्याचा म्हटलं आहे.
गौतम गंभीर हेड कोचच्या पदासाठी बीसीसीआयची पहिली पसंत नव्हती. बीसीसीआयला व्हीव्ही एस लक्ष्मण यांना कोच बनवायचं होतं. बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याच्या हवाल्याने पीटीआयने हे वृत्त दिलं आहे. राहुल द्रविड यांच्याप्रमाणे लक्ष्मण यांच्याकडे नॅशनल क्रिकेट अकादमीची जबाबदारी आहे. त्याशिवाय बीसीसीआयने काही परदेशी दिग्गजांशी संपर्क साधलेला. पण चर्चा यशस्वी झाली नाही.
काय खुलासा केला?
गंभीरला कुठल्या परिस्थितीत नाईलाजाने कोच बनवावं लागलं, त्या बद्दल बीसीसीआय अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर खुलासा केला. “गौतम गंभीर कधीच बीसीसीआयची पहिली पसंत नव्हता. काही नामवंत परदेशी प्रशिक्षकांना तिन्ही फॉर्मेटमध्ये कोच बनायचं नव्हतं. म्हणून बोर्डाला गंभीरला कोच बनवावं लागलं. त्याशिवाय अजूनही काही अडचणी होत्या” असं हा अधिकारी म्हणाला.
10 वर्षांनी मिळवून दिलं विजेतेपद
गौतम गंभीरची मागच्यावर्षी जून महिन्यात टीम इंडियाच्या हेड कोच पदी नियुक्ती करण्यात आली. टीम इंडियाच्या T20 वर्ल्ड कप विजेतेपदाससह राहुल द्रविड यांचा कार्यकाळ संपला. गंभीरने त्याआधी मे महिन्यात कोलकाता नाइट रायडर्सचा मेंटॉर म्हणून 10 वर्षांनी टीमला आयपीएलच विजेतेपद मिळवून दिलं.
अपेक्षेनुसार कामगिरी नाही
गौतम गंभीरला कोच बनवताना बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. कोच पदावर नियुक्तीची खात्री मिळाल्यानंतर गंभीरने सुद्धा या पोस्टसाठी अर्ज केला होता. त्याशिवाय डब्लूवी रमन यांनी सुद्धा अर्ज केलेला. अखेरीस गंभीर कोच बनले. गंभीर यांचा आतापर्यंतचा कार्यकाळ अपेक्षेनुसार राहिलेला नाही. न्यूझीलंड विरुद्ध कसोटी मालिकेत मायदेशात पराभव झाला. ऑस्ट्रेलियातही टीम इंडिया सीरीज जिंकण्यात अयशस्वी ठरली. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पोहोचण कठीण दिसतय.