पणजी (गोवा) : रणजीपटू राजेश घोडगे यांचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना गोव्यात घडली आहे. क्रिकेट खेळत असताना राजेश यांना हृदयविकाराचा झटका आला आणि ते मैदानातच कोसळले. त्यांना तातडीने ईएसआय रुग्णालयात व नंतर व्हिक्टर रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी राजेश घोडगे यांना मृत घोषित केले.
काळजी पिळवटून टाकणारी माहिती म्हणजे, राजेश घोडगे यांची जन्मतारीख 15 जानेवारी 1975. म्हणजेच दोनच दिवसांनी राजेश यांचा 44 वा वाढदिवस होता. गोव्यातील मार्गोओ येथे त्यांचा जन्म झाला होता. राईट हँड बॅट्समन आणि राईट आर्म ऑफब्रेक बॉलर म्हणून ते गोव्यातील क्रीडा विश्वात प्रसिद्ध होते.
गोव्यातील मार्गोओ क्रिकेट क्लबच्या (MCC) स्पर्धेत सामना खेळत होते. दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास सामना सुरु होता. एमसीसी चॅलेंजर्स विरुद्ध एमसीसी ड्रॅग्नस असा सामना सुरु असताना रणजीपटू राजेश घोडगे यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला.
प्रत्यक्षदर्शींच्या मते, राजेश घोडगे मैदानात क्रिकेट खेळत असताना, अचानक कोसळले. काही क्षण नेमके काय झाले, हे कळलंच नाही. मात्र, ते मैदानात कोसळल्यावर उठेलच नाहीत, त्यामुळे त्यांना तातडीने जवळील ईएसआय हॉस्पिटलमध्ये नेलं. तिथून त्यांना दुसऱ्या हॉस्पिटलला हलवलं. मात्र, तेथील डॉक्टरांनी राजेश घोडगे यांना मृत घोषित केले.
राजेश घोडगे यांच्या अकाली निधनाने गोव्यासह भारतीय क्रिकेटविश्वावर शोककळा पसरली आहे.
राजेश घोडगे यांची ‘ईएसपीएन क्रिक इन्फो’वरील माहिती :