मुंबई : जिद्द आणि इच्छाशक्तीच्या बळावर दादरच्या हिमानी उत्तम परबने क्रीडा पुरस्कारात विक्रमाचा झेंडा रोवला. मल्लखांबमधील उल्लेखनीय कामगिरीमुळे राष्ट्रपती कोविंद यांच्या हस्ते अर्जुन पुरस्काराने गौरव करण्यात आला. हा बहुमान मिळवणारी हिमानी ही सर्वात युवा खेळाडू ठरली. वयाच्या २० व्या वर्षी हा पुरस्कार पटकावला आहे. मल्लखांब या खेळात अर्जुन पुरस्कार मिळवणारी हिमानी ही देशातील पहिली खेळाडू ठरली. अर्जून पुरस्कार मिळाल्यानं सर्व स्तरातून हिमानी परबवर कौतुकाचा वर्षाव होत आहेत.
मल्लखांबमध्ये अर्जुन पुरस्कार मिळवणारी पहिली महिला खेळाडू
मल्लखांबमध्ये अर्जुन पुरस्कार मिळवणारी हिमानी उत्तम परब देशात पहिली महिला खेळाडू ठरली आहे. याआधी ही किमया देशातील कोणत्याही महिलेला साधता आली नाही, मात्र हिमानीने हे यश मिळवलं आहे. वयाच्या 20व्या वर्षी हिमानीकडून ही बहुमोल कामगिरी करण्यात आली आहे. त्यामुळे महाराष्ट्राची मान उंचावली आहे. मेहनत केल्यानंतर कोणतही यश संपादन करता येतं हे हिमानीने सहज सिद्ध करून दाखवले आहे.
जर्मनीतील युवकांना प्रशिक्षण दिले
लहानपणापासून या प्रकारात पटाईत असलेल्या हिमानीने याआधी अवघ्या वयाच्या नवव्या वर्षी जर्मनीतील युवकांना मल्लखांबचं प्रशिक्षण दिलं आहे. मल्लखांब हा लाकडी पोलवरील खेळ आहे. भारत, जर्मनी, अमेरिका, जपानमध्ये या खेळाचा वेगानं प्रसार होत आहे. त्यामुळे अनेक युवक या खेळाकडे आकर्षित होत आहेत आणि यश संपादीत करत आहेत. मल्लखांबचा प्रत्येक सेट हा दीड मिनिटाचा असतो. या खेळासाठी शरिराची लवचिकता अत्यंत गरजेची असते. देशात महिला खेळाडुंची संख्या वेगाने वाढत आहे. हिमानी याआधी 2019 मध्ये जागतिक चांम्पियन झाली. त्यानंतर तिच्या या भरघोस यशाची दखल घेत भारत सकारकडून तिचा गौरव करण्यात आला आहे.
पदकांची लयलूट
पारंपरिक खेळामधून सुद्धा प्रविण्य मिळवता येते ही गोष्ट हिमानी उत्तम परब हिने सिद्ध केली आहे. हिमानी हिने आजपर्यंत शंभर पेक्षा अधिक पदकांची लयलूट केली आहे. हिमानीला मिळालेल्या पुरस्कारामुळे कोकणात देखील जल्लोष करण्यात येत आहे. क्रीडा क्षेत्रासह राजकीय नेते देखील हिमानीचे कौतुक करीत आहेत. भाजप नेते निलेश राणे यांनी हिमानीचे सिंधूकन्या असा उल्लेख करीत अर्जुन पुरस्कार मिळाल्याने कौतुक केले.
कुडाळ तालुक्यातील कसाल वज्रेवाडी येथील ‘सिंधूकन्या’ मल्लखांब खेळाडू कुमारी हिमानी उत्तम परब हिला अत्यंत प्रतिष्ठेचा ‘अर्जुन पुरस्कार’ जाहीर झाला आहे. हिमानी परब हिची झालेली निवड ही सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी अभिमानास्पद आहे. कुमारी हिमानी उत्तम परब हिचे खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) November 6, 2021