भारतीय क्रिकेटमधील सुपरस्टार विराट कोहलीने आपल्या 16 वर्षाच्या करिअरमध्ये एकापेक्षा एक कडक रेकॉर्ड केले. आपल्या दीड दशकाच्या क्रिकेट करिअरमध्ये त्याने मैदानावर रेकॉर्ड्सची रांग लावली. पण चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये त्याला एक कारनामा करणं अजून जमलेलंल नाही. विराट कोहलीला चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये अजूनपर्यंत शतक झळकवता आलेलं नाहीय. विराटने ICC च्या या स्पर्धेत आतापर्यंत 13 सामन्यात 12 इनिंगमध्ये 529 धावा केल्या आहेत. या दरम्यान त्याने पाच अर्धशतक झळकावलेली आहेत. पण अजूनपर्यंत तो चॅम्पियन्स ट्रॉफी टुर्नामेंटमध्ये एकही शतक झळकवू शकलेला नाही. 19 फेब्रवारीपासून ICC चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेला सुरुवात होईल. या स्पर्धेतील 16 वर्षांपासूनचा शतकाचा दुष्काळ विराट निदान यावेळी तरी संपवतो का? ते लवकरच समजेल.
एका चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये विराट कोहली शतकाच्या खूप जवळ होता. फक्त चार धावांनी शतक हुकलेलं. तो नाबाद राहिलेला. बांग्लादेश आणि भारतात 2017 साली चॅम्पियन्स ट्रॉफीचा सेमीफायनल सामना झाला. या मॅचमध्ये बांग्लादेशने 50 ओव्हर्समध्ये 7 विकेट गमावून 265 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारताने 41 व्या ओव्हरमध्येच टार्गेट चेस केलं होतं. रोहित शर्मा 123 धावांची नाबाद इनिंग खेळला होता. विराटने 78 चेंडूत नाबाद 96 धावा केल्या होत्या. फक्त चार धावांनी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये त्याची शतकाची संधी हुकली होती.
विराटच्या रडारवर असेल बांग्लादेशची टीम
विराट कोहली चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सर्वात मोठी इनिंग बांग्लादेश विरुद्धच खेळला आहे. लवकरच सुरु होणाऱ्या या स्पर्धेत विराटच्या रडारवर बांग्लादेशचीच टीम असेल. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत 2025 मध्ये भारताचा पहिला सामना 20 फेब्रुवारीला बांग्लादेश विरुद्ध आहे. दुबईत ही मॅच होणार आहे. यानंतर 23 फेब्रुवारीला भारताचा सामना पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तान विरुद्ध आहे. भारतीय टीमचा सामना 2 मार्चला न्यूझीलंड विरुद्ध होईल. ही टुर्नामेंट पाकिस्तान आणि दुबई अशी दोन देशात होणार आहे. भारताचे सर्व सामने दुबईत खेळले जाणार आहेत.