असे अनेक क्रिकेटपटू आहेत, ज्यांनी त्यांच्या संपूर्ण वनडे करिअरमध्ये एकदाही प्लेयर ऑफ द सीरीजचा अवॉर्ड मिळालेला नाही. पाकिस्तानचा एका युवा क्रिकेटर आहे, ज्याने 9 मॅचच्या छोट्या करिअरमध्ये दोनवेळा प्लेयर ऑफ द सीरीजचा अवॉर्ड मिळवलाय. त्याला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडे सीरीजमध्ये दमदार प्रदर्शनासाठी प्लेयर ऑफ द सीरीजचा पुरस्कार मिळाला. त्याचं नाव आहे, साइम अयूब. याआधी साइम अयूब झिम्बाब्वे विरुद्ध मालिकेत प्लेयर ऑफ द सीरीज बनला होता. म्हणजे वनडे करिअरच्या तीन सीरीजमध्ये तो दोनवेळा प्लेयर ऑफ द सीरीज बनलाय. जर, साइम अयूबची अशीच कामगिरी सुरु राहिली, तर तो लवकरच सचिन तेंडुलकरचा वर्ल्ड रेकॉर्ड तोडू शकतो.
वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा प्लेयर ऑफ द सीरीज बनण्याचा रेकॉर्ड सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. सचिन 108 वनडे सीरीजमध्ये 15 वेळा प्लेयर ऑफ द सीरीज बनलाय. या यादीत दुसरं नाव विराट कोहलीच आहे. आतापर्यंत 72 वनडे सीरीजमध्ये विराट 11 वेळा प्लेयर ऑफ द सीरीज बनलाय. 3 वनडे सीरीजमध्ये दोनवेळा प्लेयर ऑफ द सीरीजचा रेशियो साइम अयूबने पुढेही कायम ठेवला, तर तो सचिन-विराटपेक्षाही पुढे निघून जाऊ शकतो.
साइम अयूबला विराट कोहलीच्या पुढे जाण्यासाठी 10 वेळा प्लेयर ऑफ द सीरीज अवॉर्ड अजून जिंकावा लागेल, तेच सचिनचा विक्रम मोडण्यासाठी त्याला अजून 14 वेळा प्लेयर ऑफ द सीरीजचा पुरस्कार मिळवावा लागेल.
त्याची कामगिरी कशी आहे?
साइम अयूबने आतापर्यंत दोनवेळा हा पुरस्कार मिळवला, त्याने त्यासाठी कशी कामगिरी केलीय त्यावर एक नजर टाकूया. साइम अयूबने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडे सीरीजमध्ये 3 सामन्यात 2 सेंच्युरीसह 235 धावा फटकावल्या. त्याच्या फलंदाजीची सरासरी होती 78.30. बॅट तळपल्यानंतर त्याने 2 विकेटही घेतले. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध प्लेयर ऑफ द सीरीज बनण्याच श्रेय त्याने संपूर्ण टीमला दिलं.
दक्षिण आफ्रिकेच्या आधी झिम्बाब्वे विरुद्धही तो प्लेयर ऑफ द सीरीजचा मानकरी ठरला. त्याने 77.50 च्या सरासरीने 155 धावा केल्या. यात 113 हा त्याचा बेस्ट स्कोर होता. त्याशिवाय गोलंदाजीत त्याने 3 विकेट घेतले.