नवी दिल्ली : घर संसार संभाळणाऱ्या महिलांमध्ये सुद्धा क्षमता, टॅलेंट असतं. अनेकदा अंगी कौशल्य असून सुद्धा त्यांचं टॅलेंट चार भितींपुरता मर्यादीत ठेवलं जातं. ज्या महिलांना टॅलेंट दाखवण्याची संधी मिळते, त्या आपल्या कौशल्याने थक्क करुन सोडतात. तुम्ही विचार केला नसेल, अशी कल्पकता, क्षमता त्यांच्यामध्ये दिसून येते. उत्तराखंडमध्ये राहणाऱ्या प्रतिभा थापियाल नावाच्या महिलेने असंच काहीस करुन दाखवलय.
दोन मुलांची आई असलेली प्रतिभा बॉडीबिल्डिंगमध्ये नॅशनल चॅम्पियन आहे. प्रतिभा थापियाल यांच वय आता 41 आहे. अंगी मेहनत करण्याची वृत्ती आणि आवड असेल, तर काहीही अशक्य नाही, हेच यातून दिसून येतं.
पहिल्याच प्रयत्नात गोल्ड मेडल
उत्तराखंडच्या पौडी गढवाल येथे राहणाऱ्या प्रतिभा यांनी मध्य प्रदेशच्या रतलाम येथे झालेल्या 13 व्या नॅशनल महिला बॉडी बिल्डिंग चॅम्पियनशिपमध्ये गोल्ड मेडल मिळवलं. प्रतिभा पहिल्यांदा या चॅम्पियनशिप स्पर्धेत उतरल्या होत्या. या मेडलमुळे त्यांचा आत्मविश्वास खूप उंचावला आहे.
असा सुरु झाला बॉडी बिल्डिंगचा प्रवास
प्रतिभा दोन मुलांची आई आहे. एक मुलगा 15 वर्षांचा असून तो 10 व्या इयत्तेत शिकतो. दुसरा मुलगा 17 वर्षांचा असून तो 12 व्या इयत्तेत आहे. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, 2018 मध्ये प्रतिभा यांना शरीरातील थायरॉइड लेव्हल वाढल्याच समजलं. त्यावेळी डॉक्टरांनी त्यांना व्यायाम करण्याचा सल्ला दिला. प्रतिभा यांनी आपल्या नवऱ्यासोबत जीम जॉइंन केली. तिथूनच त्यांचा फिटनेस प्रवास सुरु झाला. काही महिन्यात प्रतिभा यांचं वजन 30 किलोने घटलं.
तेव्हा शेजाऱ्यांनी टोमणा मारला
मागच्यावर्षी पहिल्यांदा प्रतिभा यांनी बॉडी बिल्डिंग स्पर्धेत भाग घेतला होता. सिक्किममध्ये झालेल्या स्पर्धेत त्यांना चौथ्या स्थानावर समाधान मानाव लागलं. बॉडी बिल्डिंगच्या क्षेत्रात प्रवेश करण्याबद्दल सुरुवातीला त्या फारशा उत्सुक नव्हत्या. बॉडी बिल्डिंग करताना जे कपडे घालावे लागतात, त्या बद्दल त्या सहज नव्हत्या. पहिल्यांदा त्यांनी असा प्रयत्न केला, तेव्हा शेजाऱ्यांनी त्यांना टोमणा मारला.
नवऱ्याची मिळाली साथ
या सगळ्या प्रवासात प्रतिभा यांना त्यांच्या नवऱ्याने साथ दिली. त्याच्या मदतीने त्यांनी अडथळे पार केले. प्रतिभा आता एशियन आणि वर्ल्ड चॅम्पियनशिपची तयारी करत आहेत. दररोज जवळपास सात तास त्या जीममध्ये वर्कआऊट करतात. डाएट प्लानही त्या खूप स्ट्रिक्टली पाळतात. याच मेहनतीमुळे त्यांना मेडल जिंकता आलं.