IND vs WI: टी 20 मध्ये भारताची जोरदार सुरुवात, बिश्नोई-रोहितच्या बळावर वेस्ट इंडिजला हरवलं

| Updated on: Feb 16, 2022 | 11:17 PM

IND vs WI: पहिल्या टी 20 सामन्यात भारताने वेस्ट इंडिजचा (India vs West indies) सहा गडी राखून पराभव केला आहे.

IND vs WI: टी 20 मध्ये भारताची जोरदार सुरुवात, बिश्नोई-रोहितच्या बळावर वेस्ट इंडिजला हरवलं
Follow us on

कोलकाता: पहिल्या टी 20 सामन्यात भारताने वेस्ट इंडिजचा (India vs West indies) सहा गडी राखून पराभव केला आहे. वनडे प्रमाणे टी 20 मध्ये भारताची दमदार कामगिरी कायम आहे. भारताने तीन टी 20 सामन्याच्या सीरीजमध्ये 1-0 अशी आघाडी घेतली आहे. सूर्यकुमार यादव (Suryakumar yadav) आणि वेंकटेश अय्यरच्या (Venktesh iyer) जोडीने भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. वेस्ट इंडिजने विजयासाठी दिलेलं 158 धावांच लक्ष्य भारताने आरामात पार केलं. भारताकडून रोहित शर्माने सर्वाधिक 40 धावा केल्या. रोहितने भारताला जबरदस्त सुरुवात करुन दिली. त्याने 19 चेंडूत 40 धावा तडकावल्या. यात चार चौकार आणि तीन षटकार होते. त्यानंतर इशान किशनने 35 धावा केल्या. विराट कोहलीने चांगली सुरुवात केली होती. पण 17 धावांवर तो एलेनच्या गोलंदाजीवर बाद झाला. ऋषभ पंतने स्वस्तात आठ धावांवर बाद झाला. भारताचा डाव अडचणीत सापडलेला असताना सूर्यकुमार यादव आणि वेंकटेश अय्यरने डाव सावरला व भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.

रोहित शर्माने हुशारीने गोलंदाजीत केले बदल

तत्पूर्वी नाणेफेक जिंकून रोहितने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. वेस्ट इंडिजने भारताला विजयासाठी 158 धावांच लक्ष्य दिलं होतं. वेस्ट इंडिजच्या टीममध्ये मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे. मैदानावर निकोलस पूरन, मेयर्स आणि पोलार्डने तशी फटकेबाजीही केली. वेस्ट इंडिजचा संघ मोठी धावसंख्या उभारु शकला असता. पण कॅप्टन रोहित शर्माने गोलंदाजीत हुशारीने बदल करत त्यांना 157 धावांवर रोखलं.


रवी बिश्नोईची किफायती गोलंदाजी

भारताकडून सर्वात किफायती गोलंदाजी केली, ती रवी बिश्नोईने. त्याने चार षटकात 17 धावा देत दोन विकेट काढल्या. डेब्यु मॅचमध्ये रवी बिष्नोईने एकाच ओव्हरमध्ये दोन विकेट काढल्या. रोव्हमॅन पॉवेलला त्याने दोन धावांवर वेंकटेशन अय्यरकरवी झेलबाद केले. त्याआधी त्याने वेस्ट इंडिजच्या रॉस्टन चेसला चार धावांवर पायचीत पकडलं व करीयरमधली पहिली आंतरराष्ट्रीय विकेट मिळवली. अन्य भारतीय गोलंदाजांनीही चांगली गोलंदाजी केली. हर्षल पटेल, रवी बिश्नोईने प्रत्येकी दोन तर भुवनेश्वर कुमार, दीपक चहर आणि युजवेंद्र चहलने प्रत्येकी एक विकेट घेतला