India vs Argentina Match: भारत-अर्जेंटिनामध्ये झालेल्या फुटबॉल सामन्याबद्दल तुम्हाला माहित आहे का?

| Updated on: Dec 21, 2022 | 4:58 PM

India vs Argentina Match: तुम्हाला विश्वास नाही बसणार, भारताने त्या सामन्यात जोरदार टक्कर दिलेली. काय घडलं होतं तेव्हा?

India vs Argentina Match: भारत-अर्जेंटिनामध्ये झालेल्या फुटबॉल सामन्याबद्दल तुम्हाला माहित आहे का?
India vs Argentina
Image Credit source: (@Mohanbagan)
Follow us on

India vs Argentina Match: फुटबॉल विश्वात अर्जेंटिनाने पुन्हा एकदा आपला गतलौकीक प्राप्त केलाय. लियोनल मेस्सीच्या नेतृत्वाखाली अर्जेंटिनाने 2022 फुटबॉल वर्ल्ड कपच जेतेपद पटकावलं. कतारमध्ये झालेल्या स्पर्धेची फायनल 18 डिसेंबरला झाली. अर्जेंटिनाने या मॅचमध्ये गतविजेत्या फ्रान्सला नमवून विजेतेपद पटकावलं. लियोनल मेस्सी आणि अर्जेंटिनाचे फॅन्स भारतातही मोठ्या संख्येने आहेत. भारतीय फुटबॉल टीम वर्ल्डकपमध्ये क्वालिफाय करु शकली नाही. पण अर्जेंटिनाच्या विजयाच भारतातही जोरदार सेलिब्रेशन झालं.

किती वर्षापूर्वी झाला होता भारत-अर्जेंटिना सामना?

फुटबॉलमध्ये भारताने फार मोठी मजल मारलेली नाही. पण भारत आणि अर्जेंटिनाच्या टीममध्ये झालेल्या फुटबॉल मॅचबद्दल तुम्हाला माहित आहे का? त्या मॅचमध्ये भारतीय टीमने अर्जेंटिनाच्या संघाला कडवी टक्कर दिली होती. दोन्ही टीम्समध्ये 39 वर्षांपूर्वी शानदार सामना झाला होता.

1984 साली झाला भारत-अर्जेंटिना सामना?

भारत आणि अर्जेंटिनामध्ये आतापर्यंत एकच फुटबॉल सामना झाला आहे. नेहरु कप टुर्नामेंटमध्ये 13 जानेवारी 1984 रोजी हा सामना झाला होता. 1978 मध्ये अर्जेंटिनाच्या टीमने आपला पहिला वर्ल्ड कप जिंकला. भारतात सामना खेळून गेल्यानंतर दोन वर्षांनी अर्जेंटिनाने 1986 साली दुसरा वर्ल्ड कप जिंकला. त्यावेळी अर्जेंटिना दिग्गज खेळाडूंनी भरलेला एक मजबूत संघ होता.

किती हजार प्रेक्षकांनी पाहिला सामना?

कोलकाताच्या इडन गार्डन्सवर भारत-अर्जेंटिनामध्ये हा फुटबॉल सामना झाला होता. 50 हजार प्रेक्षक हा सामना पाहण्यासाठी मैदानात उपस्थित होते. त्यांनी स्टेडिममध्ये बसून या सामन्याचा आनंद घेतला होता. भारतीय टीममध्ये विश्वजीत भट्टाचार्य, रवि आणि बाबू मणि सारखे स्टार प्लेयर होते. विश्वजीतने याच टुर्नामेंटमध्ये दोन दिवस आधी पोलंड विरुद्ध एक गोल डागला होता. अर्जेंटिनाच्या टीममध्ये रिकार्डो गारेगा, जॉर्ज बुर्रुचागा आणि गिउस्ती सारखे दिग्गज प्लेयर होते.

या सामन्यात बलाढ्य अर्जेंटिनाची काय स्थिती होती?

भारतीय टीमने या मॅचमध्ये अर्जेंटिना सारख्या बलाढ्य संघाला कडवी टक्कर दिली होती. पहिल्या हाफमध्ये एकही गोल डागू दिला नव्हता. पहिल्या हाफमध्ये दोन्ही टीम्स 0-0 अशा स्थितीमध्ये होते. दुसऱ्या हाफमध्ये अर्जेंटिनाने आपली ताकत झोकून दिली. त्यामुळे रिकार्डो गारेगाने 79 व्या मिनिटला पहिला गोल केला. या गोलच्या बळावर अर्जेंटिनाचा हा सामना जिंकला. मॅचमध्ये टीम इंडियाला गोल करण्याच्या काही संधी मिळाल्या. पण अर्जेंटिनाचा गोलकीपर नेरी पम्पिडोने प्रत्येक प्रयत्न अयशस्वी ठरवला.