पुणे : भारत आणि इंग्लंड यांच्यात तिसरा एकदिवसीय सामना (India vs England 3nd odi) आज पुण्याच्या गहुंजे मैदानात खेळवण्यात येतोय. इंग्लंडने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीचं निमंत्रण दिलं. भारतीय सलामीवीरांनी चांगली सुरुवात केली. रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि शिखर धवन (Shikhar Dhawan) यांनी पहिल्या विकेटसाठी 103 धावांची भागीदारी केली. मात्र, रोहित शर्मा आदिल राशिदच्या (Adil Rashid) फिरकीच्या जाळ्यात अडकून क्लीन बोल्ड झाला. रोहित पाठोपाठ शिखर धवनही पुढच्या षटकात बाद झाला. त्यानंतर मैदानावर आलेला कर्णधार विराट कोहली (Virat Kohali) देखील फिरकीपटू मोईन अलीचा शिकार झाला. याआधीच्या सामन्यातही विराट फिरकीपटू आदिल राशिदच्या जाळ्यात अडकला होता. फिरकीपटूंच्या बोलिंगवर लगातार अशाप्रकारे आऊट होणं हे विराट आणि टीम इंडियासाठी चिंतेचा विषय आहे.
इंग्लंडच्या दोन फिरकीपटूंनी विराटला 9 वेळा बाद केलंय
तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडचा फिरकीपटू मोईन अलीने विराटला शिकार बनवलं. त्यामुळे विराट आजच्या सामन्यात फारसा जलवा दाखवू शकला नाही. विशेष म्हणजे मोईनची आजची विकेट पकडली तर त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांमध्ये आतापर्यंत 9 वेळा विराटचा बाद केलंय. त्याचबरोबर इंग्लंडचा फिरकीपटू आदिल राशीद याने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात विराटचा बळी घेतला होता. त्या सामन्यात तर विराट फॉर्ममध्ये होता. त्याने 77 धावा ठोकल्या होत्या. पण अखेर राशिदने त्याच्या फिरकीच्या जाळ्यात अडकवत विराटची विकेट घेतली. आदिल राशीदने आतापर्यंत 9 वेळा विराट कोहलीला पॅव्हेलियनमध्ये पाठवलं आहे. कोहलीसारख्या वर्ल्ड क्लास फलंदाजाला सर्व फॉरमॅटमध्ये सर्वाधिकवेळा बाद करण्याचा पराक्रम आदिल राशीदने गाजवला आहे.
फिरकीपटूंकडून शिकार
फिरकीपटू मोईन अली आणि राशीदने कोहलीला 9 वेळा बाद केलं आहे. त्यापाठोपाठ ग्रॅमी स्वानने 8 वेळा, ऑस्ट्रेलियाच्या अॅडम झाम्पा आणि नॅथन लायनने प्रत्येकी 7 वेळा कोहलीला बाद केलं आहे.
राशीदने कोहलीला 9 वेळा बाद केलं असलं, तरी फिरकी आणि वेगवान गोलंदाजांच्या यादीत तो दुसऱ्या क्रमांकावर आहे. कारण न्यूझीलंडचा गोलंदाज टीम साऊदीने विराट कोहलीला आतापर्यंत 10 वेळा बाद केलं आहे.
टीम साऊदी (न्यूझीलंड) – 10 वेळा
आदिल राशीद (इंग्लंड) – 09
मोइन अली (इंग्लंड) – 09
ग्रॅमी स्वान – (इंग्लंड) – 8
बेन स्टोक्स (इंग्लंड) – 08
जेम्स एंडरसन (इंग्लंड) – 08
दुसरीकडे विराट कोहलीच्या विक्रमाबाबत बोलायचं झाल्यास, वन डे क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत, त्याने दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार ग्रॅमी स्मिथला मागे सोडलं आहे. स्मिथने वन डे सामन्यात कर्णधार म्हणून 5416 धावा केल्या होत्या. कोहलीने आजच्या सामन्यात 41 धावा करताच, त्याने स्मिथच्या पुढे मजल मारली. सर्वाधिक धावसंख्या करणाऱ्या कर्णधारांच्या यादीत कोहली आता पाचव्या स्थानावर आहे.
या यादीत पहिल्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग आहे. त्याने कर्णधारपदावर असताना 8497 धावा केल्या आहेत. त्यानंतर कॅप्टन कूल माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी 6641 धावा, स्टीफन फ्लेमिंग 6295 आणि अर्जुन राणातुंगा 5608 धावा यांचा नंबर लागतो.
संबंधित बातम्या :
चार गडी तंबूत परतले, पंत आणि पांड्याच्या भागीदारीचं नवं वादळ, इंग्लिश गोलंदाजांना धू धू धुतलं
संकट समयी ऋषभ पंत, पांड्या आणि शार्दूलची आक्रमक खेळी, टीम इंडियाकडून इंग्लंडला 330 धावांचे आव्हान